गोवा : चांदोरच्या तरुणाच्या खुनाचा अखेर छडा | पुढारी

गोवा : चांदोरच्या तरुणाच्या खुनाचा अखेर छडा

मडगाव; रतिका नाईक :  गोव्यातील जॉन डायस (27, चांदोर) याची टेक्सास (युनायटेड स्टेट्स) राज्यातील ह्युस्टन शहरात गोळी घालून खून केल्याप्रकरणी अखेर जॉर्जिया पोलिसांनी तब्बल चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर संशयीत जाक्येल रहीम कर्रूथ (24) याच्या मुसक्या आवळल्या. चोरीच्या उद्देशाने किराणा स्टोअरमध्ये घुसलेल्या कर्रूथ याने गोमंतकीय जॉन याच्यावर गोळीबार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्‍न झाले आहे. ह्युस्टन शहरात जॉनचा खून केल्यानंतर रहीम तब्बल तेराशे किलोमीटरवरील जॉर्जिया शहरात लपून बसला होता.

सविस्तर माहितीनुसार, 20 मार्च रोजी (रविवारी) सकाळच्या वेळी ह्युस्टन शहरातील एका फूड स्टोअरमध्ये (व्ही स्टॉप फूड मार्ट) हे खून प्रकरण घडले. हुडी (जॅकेट) आणि तोंडावर मास्क घालून आलेल्या संशयिताने काऊंटरवर पोचल्यावर येथे कॅशीयर म्हणून नोकरी करणार्‍या जॉन याचा गोळी घालून खून केला व येथून धूम ठोकली. या घटनेने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते. यावेळी जॉन अवघ्या 27 वर्षाचा होता. चांदोर येथील रहिवासी असलेला जॉन फक्त दोन वर्षांपूर्वी घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे नोकरीसाठी परदेशात गेला होता. त्यापूर्वी गोव्यात तो एका हॉटेलमध्ये काम करत होता.

खून झाल्यानंतर संशयिताला पकडण्यासाठी ह्युस्टन पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही तपासली असता त्यांना संशयीताशी मिळता जुळता माणूस घटनेच्या पूर्वीही स्टोअरमध्ये आल्याचे आढळून आले. संशयिताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडीओ सर्वत्र पसरविला होता. संशयिताला पकडण्यात या व्हिडीओची मदत झाली. या व्हिडिओद्वारे शोध घेत असताना जॉर्जिया पोलिसांनी संशयीत कर्रूथ याला 3 ऑगस्ट रोजी अटक केली. जॉर्जिया ह्युस्टनपासून तेराशे किलोमीटरवर आहे. आता जॉर्जिया पोलिसाद्वारे संशयिताला ह्युस्टन – टेक्सास पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

चांदोर गावावर पसरली होती शोककळा
जॉन हा आई-वडिलांचा एकमेव पुत्र होता. वडील वारल्याने आईबरोबर तो चांदोर येथे राहत होता. परिस्थिती हलाखीची असल्याने आईला गोव्यात ठेवून तो पैसे कमाविण्यासाठी परदेशात गेला होता. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जॉन हा उत्तम फुटबॉलपटूही होता. गोव्यात असताना त्याने चांदोर आणि गिरदोली फुटबॉल क्लबसाठी गोलकीपर म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे. त्यावेळी जॉन याच्या अचानक जाण्याने चांदोर गावावर शोककळा पसरली होती.

Back to top button