गोवा : मंदार सुर्लकर याच्या मारेकर्‍यांना दिलासा नाहीच | पुढारी

गोवा : मंदार सुर्लकर याच्या मारेकर्‍यांना दिलासा नाहीच

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  मंदार सुर्लकर याचा 14 ऑगस्ट 2006 रोजी खून केल्याप्रकरणी रोहन पै धुंगट, जोवितो रायन पिंटो , शेख नफियाज मामलेकर आणि शंकर तिवारी हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या आरोपींनी तुरुंगात 14 वर्षे शिक्षा भोगली नाहीत या मुख्य कारणामुळे वरील चारजणांच्या वकिलांनी शिक्षा माफ करण्याची केलेली विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे या आरोपींचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

2006 घडलेल्या या खून प्रकरणाने संपूर्ण गोवा हादरला होता. कारण मंदार सुर्लकर या डिजे म्हणून काम करणार्‍या अल्पवयीन युवकाचा त्याच्याच पाच मित्रांनी 50 लाखांच्या खंडणीसाठी बेसबॉलच्या बॅटने मारहाण करून खून केला होता. तेव्हापासून वरील चारजण जन्मठेपेची शिक्षा भोगत असून, खुनात सहभागी असलेला पाचवा आरोपी अल सलेहा बेग हा माफीचा साक्षीदार झाल्याने सुटला होता.
आपली तुरुंगात 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. जन्मठेप भोगल्यासारखे झाले आहे. त्यामुळे आमची मुक्तता करावी अशी मागणी चारही आरोपींच्या वकिलांनी केली होती. या मागणीवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई यांनी चारही आरोपींनी सलगपणे 14 वर्षे तुरुंगवास भोगलेले नाही. हे सर्व विविध वेळी पेरोल व फर्लोवर घरी राहिले आहेत. त्यामुळे त्यांची जन्मठेप पूर्ण झाल्याचे सिद्ध होत नाही. असे सांगून चारही जनांनी अटक केल्यापासून पेरोल, फर्लो व इतर सुट्टया घेऊन तुरुंगाबाहेर कसे दिवस घालविले व किती दिवस तुरुंगवास घालवले यांचा हिशेब अ‍ॅड. फळदेसाई यांनी न्यायालयासमोर मांडला. या हिशेबानुसार चारपैकी एकाही कैद्याने तुरुंगात सलग 14 वर्षे घालविली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे न्यायालयाने याच मुद्यावर निवाडा देताना सुटकेची मागणी फेटाळून लावली.

बंदी करून मारहाण

खून प्रकरणात सहभागी असलेले पाचही आरोपी उच्चशिक्षित घराण्यातील होते. त्यांनी त्यांचा मित्र असलेल्या मंदार सुर्लकर याच अपहरण केलं. अपहरण करून त्याला या पाच मित्रांपैकी एकाच्या घरी नेण्यात आलं. तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला दोरीने घट्ट बांधून त्याच्याकडून वडिलांडे 50 लाख खंडणी मागणारा संदेश रेकॉर्ड करण्यात आला. मात्र, मंदारचे वडील दीपक सुर्लकर यांनी खंडणी न देता वास्को पोलिसांत त्याबाबत तक्रार केली. इकडे पहिल्यांदाच एका युवकाचे अपहरण केलेले पाचही जण घाबरले. आपण पकडलो जाणाऱ, पोलिस आपणाला अटक करून मारहाण करणार, आपली बदनामी होईल या भीतीने पाचही जणांनी बेसबॉल बॅटच्या सहाय्याने मंदारवर आघात केले व त्याला ठार करून त्याचा मृतदेह केरी फोंडा इथे एका निर्जनस्थळी टाकून दिला. पोलिसांनी मंदारच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मारहाण व गळा आवळल्याने मंदारचा जीव गेल्याचे सिद्ध झाले होते. पाच आरोपीपैकी एक आरोपी अल सलेहा बेग हा माफीचा साक्षीदार बनला आणि त्यांने घटनाक्रम सांगितले. त्यामुळे त्याची सुटका झाली. खुनाच्या घटनेवेळी 4 आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे गोवा बाल न्यायालयासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले. बाल न्यायालयाने या चारही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाल न्यायालयाच्या निवाड्यावर 2014 साली उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सध्या चारही आरोपी कोलवाळ तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मध्यंतरी ते काहीकाळ पेरोल तसेच फर्लोवर बाहेर आले होते.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत

उच्च न्यायालयाच्या निवाड्याने आम्ही स्वागत करत आहोत. या निवाड्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. आमच्या मंदारचा अमानुषपणे खून करणार्‍याला जन्मठेप व्हायला हवी. त्यांना जन्मभर तुरुंगातच ठेवायला हवे. त्यांच्या वागण्यावरून त्यांना त्यांच्या कृतीचा पश्चात्ताप झालेला नाही हे जाणवते. चारही आरोपी सुटले, तर आमच्या जीवाला धोका पोचवू शकतात, अशी प्रतिक्रिया मंदार सुर्लकर यांचे वडील दीपक सुर्लकर व आई दिप्‍ती सुर्लकर यांनी न्यायालयाच्या निवाड्यानंतर व्यक्त केल्या.

Back to top button