गोवा : वादग्रस्त बार स्मृती इराणी कुटुंबीयांचाच | पुढारी

गोवा : वादग्रस्त बार स्मृती इराणी कुटुंबीयांचाच

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  आसगाव येथील सिली सोर्स कॅफे अँड बार केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचा असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. बुधवारी पणजी येथे पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. इराणी यांच्या पतीच्या कंपनीचा आणि बारचा ‘जीएसटी’ क्रमांक व पत्ता एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

चोडणकर म्हणाले की, स्मृती इराणी यांचे पती झुबीन इराणी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍तींची उग्रया ऍग्रो’ आणि उग्रया मर्कंटाईल’ या दोन कंपन्यात 67 टक्के भागीदारी आहे. या दोन कंपन्या ‘एटऑलफूड अँड ब्रेव्हरेजेस एलएलपी’ या तिसर्‍या कंपनीला प्रमोट करतात.
एटऑलफूड हे अन्य तीन भागीदारांसह सिली सोर्स कॅफे अँड बार’ चालविले जाते. सिली सोर्सचा आणि
एटऑलफूडचा जीएसटी क्रमांक आणि पत्ता एकच आहे.

ते म्हणाले, स्मृती इराणी यांनी कन्या झोईश इराणी यांनी एका मुलाखतीमध्ये सिली सोर्स आपण चालवित असल्याचे सांगितले होते. ही मुलखात स्मृती इराणी यांनी आपल्या इंस्टाग्रामवर सामायिक करीत मला माझ्या मुलीचा अभिमान असल्याचे म्हटले होते. इराणी यांचे पती झुबीन इराणी आपल्या इंस्टाग्रामच्या माहितीवर सिली सोल्सचा उल्लेख केला आहे. इराणी यांनी निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात झुबीन यांनी या दोन कंपन्या आपल्या असल्याचे म्हटले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या सर्व कागदपत्रांनुसार तो बार इराणी कुटूंबीयांचा आहे, हे सिद्ध होते. त्यामुळे स्मृती इराणी यांनी खोटे बोलणे सोडून द्यावे. या प्रकरणी मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान यांनी चुप्पी सोडून कारवाई करणे आवश्यक असल्याचे चोडणकर यांनी सांगितले.

स्मृती इराणींना खोटे बोलण्याचा विकार

चोडणकर यांनी आरोप केला की, स्मृती इराणींना खोटे बोलण्याचा विकार जडला आहे. त्या सफाईदारपणे खोटे बोलतात. याआधीही त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबत खोटे प्रमाणापत्र दिले होते. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.

 
उत्पादन शुल्क अधिकार्‍याकडून विशेष सेवा
चोडणकर म्हणाले की, उत्पादन शुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याकडून सिली सोल्सला विशेष सेवा दिली जाते. येथे स्थानिकांना नूतनीकरण परवाना देण्यासाठी हेलपाटे मारवे लागतात. मात्र, त्या अधिकार्‍याच्या मदतीने सिली सोल्सचे काम लवकर पूर्ण करण्यात आले.

खळबळजनक वक्‍तव्याने फरक पडत नाही : राणे
नगरनियोजन मंत्री विश्‍वजित राणे म्हणाले की, स्मृती इराणी या माझ्या नेत्या आहेत आणि पुढेही राहतील. बार बाबत कायदा योग्य त्या पद्धतीने काम करेल. याबाबत काँग्रेस किंवा अन्य कुणीही खळबळजनक वक्‍तव्य केल्याने कोणताही फरक पडत नाही.

Back to top button