गोवा : शाळा विलीनीकरणास राज्यातून तीव्र विरोध | पुढारी

गोवा : शाळा विलीनीकरणास राज्यातून तीव्र विरोध

पणजी/पेडणे/वाळपई; पुढारी वृत्तसेवा :  एक शिक्षकी शाळा तसेच कमी पटसंख्या यासारख्या कारणांमुळे शाळांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मार्च 2023 पर्यंत देशामध्ये एक शिक्षकी शाळा बंद करावयाच्या आहेत. केंद्र सरकारचेच असे धोरण आहे. या धोरणानुसार राज्यातील कार्यवाही सुरू आहे. राज्यातील अडीचशेेच्यावर सरकारी प्राथमिक मराठी शाळांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. त्यास राज्यभरातून तीव्र विरोध होत आहे.

बहुतेक शाळांचा, शिक्षकांचा विलीनीकरणास विरोध आहे. त्यांचे पडसाद उमटत आहेत. सरकारच्या विरोधात बोलण्यास शिक्षक, शिक्षिका घाबरतात. नोकरी सरकारी असल्याने सरकारच्या विरोधात कसे बोलायचे, असा प्रश्‍न त्यांना पडतो. समाज माध्यमांमध्ये मात्र शिक्षकवर्ग आपली मते व्यक्‍त करत आहेत. अनेक गावांतील पालकांनी बुधवारी रस्त्यावर येऊन शाळांच्या विलीनीकरणास विरोध केला.

आमच्या गावातील शाळा चांगली आहे. तेथे सुविधाही आहेत. सरकारला आणखी सुविधा द्यायच्या असतील तर याच शाळेत द्याव्यात. आम्हाला नवीन शाळा नको आहे.  या शाळेतील शिक्षक, शिक्षिका विद्यार्थ्यांना चांगले शिकवितात. शाळेला विद्यार्थी मिळावेत म्हणून आम्ही पालकांनी वर्गणी काढून केजीचा वर्गही सुरू केलेला आहे. त्यामुळे शाळेला भविष्यात विद्यार्थीही मिळू शकतील. ही शाळा आमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वार्थाने सोयीची आहे, असे भटवाडी-कोरगाव, पेडणे सरकारी शाळेतील विद्यार्थ्याचे एक पालक म्हणाले.

पार्से येथील पालक एकवटले
भटवाडी-कोरगाव पाठोपाठ आता पार्से येथील भाऊ दाजी लाड सरकारी प्राथमिक शाळेच्या पालकांनीही शाळा विलीनीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शवला. वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रखर विरोधाला न जुमानता आम्ही आमची शाळा वाचविणार आहोत. शिवाय रक्‍तपात झाला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, असा इशारा पालकांनी यावेळी सरकारला दिलेला आहे.
पालक श्रीराम साळगावकर यांनी सांगितले की, पार्से गावाचे वैभव आणि पूर्ण देशपातळीवर नावाजलेली डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या नावाने ही शाळा आजपर्यंत कार्यरत आहे. पूर्वी या शाळेमध्ये सातवीपर्यंत वर्ग चालायचे. कालांतराने केवळ चौथीपर्यंत वर्ग सुरू केलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही शाळा विलीन करू देणार नाही.

सोनाळ येथेही विरोध
सरकारच्या निर्णयाचा सत्तरी तालुक्यातील सोनाळ येथील प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र विरोध केला. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. शाळा स्थलांतरित केल्यास ही गंभीर समस्या पालकांसमोर निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम या भागातील निर्माण झालेल्या समस्या सोडवाव्यात व त्यानंतरच प्राथमिक शाळेचे स्थलांतर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

बाराजण येथे पालक आक्रमक
खोतोडा पंचायत क्षेत्रातील बाराजण गावात 40 वर्षांपासून सुरू असलेली प्राथमिक शाळा खडकी या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला आहे. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून याला तीव्र विरोध केला जात आहे. यासंदर्भाचे निवेदन बुधवारी वाळपई भागशिक्षणाधिकार्‍यांना दिले.

सरकारने परवानगी दिल्यास 250 मराठी माध्यमांच्या सरकारी शाळा, चालवण्याची जबाबदारी, विद्याभारती गोवा ही शैक्षणिक संघटना पेलण्यास तयार आहे.
– प्रा. सुभाष वेलिंगकर, विद्याभारती, राज्य संरक्षक

Back to top button