गोवा : सांगे तालुक्यात वर्चस्वासाठी होणार लढाई | पुढारी

गोवा : सांगे तालुक्यात वर्चस्वासाठी होणार लढाई

मडगाव; विशाल नाईक :  विधानसभा निवडणुकीत सुरू झालेले राजकारण अजून संपलेले नाही. सांगेत सुभाष फळदेसाई यांना पराभूत करण्यासाठी एकत्र आलेले घटक पुन्हा पंचायत निवडणुकीत सक्रिय झाले आहेत.

सांगेतील सात पंचायतींपैकी कावरे पिर्ला पंचायतीत सुभाष फळदेसाई यांनी आपले समर्थक तीन पंच बिनविरोध निवडून आणले आहेत. त्यामुळे ही पंचायत जवळपास त्यांच्या ताब्यात आली आहे. रिवण पंचायतीत माजी सरपंच सूर्या नाईक यांच्या मातोश्री सुमित्रा नाईक यांना बिनविरोध निवडून आणत फळदेसाई यांनी तेथेही आपले खाते उघडले आहे. माजी आमदार प्रसाद गावकर यांचा गाव असलेल्या मळकर्णे पंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. प्रसाद गावकर यांच्यासाठी मळकर्णे पंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा बनली आहे. तिथेही फळदेसाई यांनी आपल्या समर्थकांचे पॅनेल उभे केल्याने ही लढत लक्षवेधी होणार आहे.

प्रसाद गावकर आमदार असताना त्यांनी मळकर्णेची पंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि पंचायत त्यांचा हातातून निसटली. फळदेसाई आमदार झाल्यानंतर जयश्री गावकर यांना सरपंचपदी निवडण्यात आले.आता प्रसाद गावकर यांच्याकडून पुन्हा ही पंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी पंच संदीप मळकर्णेकर यांच्याकडूनही ही पंचायत सुभाष यांच्या ताब्यात जाऊ नये, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

संदीप मालकर्णेकर यांच्या हस्तक्षेपामुळे सावित्री कवळेकर यांच्याही नावाची चर्चा पंचायतीत सुरू आहे. फळदेसाई यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजेश गावकर यांच्या विरोधात अविनाश गावकर हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. फळदेसाई यांनी आपले पॅनल या पंचायतीत उतरवले आहे.

रिवण पंचायतीच्या एकूण नऊ प्रभागापैकी एका प्रभागात माजी सरपंच सूर्या नाईक यांच्या आई सुमित्रा नाईक यांची बिनविरोध निवड करून मंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपले खाते पूर्वीच उघडले आहे. इतर आठ प्रभागांत त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. रिवण पंचायतीत विरोधी पक्ष किंवा सुभाष फळदेसाई यांच्याविरोधी राजकारण्यांनी लक्ष घातलेले नाही. वाडे कुर्डी पंचायत क्षेत्रात मात्र सुभाष विरोधकांनी मान वर काढली आहे. काही प्रभागात सुभाष फळदेसाई यांच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यामागे सावित्री कवळेकर यांचा हात असल्याची चर्चा आहे.त्यांनी मळकर्णे आणि वाडे कुर्डी पंचायतीसाठी प्रसाद गावकर यांच्याशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे.

कावरे पिर्ला ही सुभाष फळदेसाई यांची स्वतःच्या गावातील पंचायत आहे. सात प्रभागांच्या या पंचायतीत त्यांनी दत्तेश गावकर, माधुरी देविदास आणि विधी वेळीप हे तीन पंच बिनविरोध निवडून आणले आहेत.त्यांचा आणखी एक पंच निवडुन आल्यास ही पंचायत त्यांच्या हातात जाणार आहे. पॅनलचे उर्वरित चारही पंच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.उगे, नेत्रावळी, भाटी या पंचायतीवर सुद्धा भाजप समर्थक उमेदवारांचे पॅनल फळदेसाई यांनी उभे केले आहे.

प्रसाद गावकर-सावित्री यांची हातमिळवणी?
सांगेतील सात पंचायतीपैकी वाडे कुर्डी आणि मळकर्णे या दोन पंचायतीमध्ये सुभाष यांच्या विरोधकांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. माजी आमदार प्रसाद गावकर आणि सावित्री कवळेकर यांनी या दोन्ही पंचायतीसाठी हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे. या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मात्र, सावित्री कवळेकरांचे खंदे समर्थक संदीप मळकर्णेकर आणि माजी आमदार प्रसाद गावकर यांचे समर्थक माजी पंच राहिलेले संदेश गावकर यांच्या एकत्रितपणे हालचाली पाहायला मिळत आहेत.

Back to top button