गोवा : यंदा पाऊस कमी? | पुढारी

गोवा : यंदा पाऊस कमी?

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  ला-निनाचा प्रभाव अपेक्षित नसल्याने राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोमवारी खात्यातर्फे मान्सूनचा दोन महिन्यांच्या लांब पल्ल्याचा अंदाज जाहीर करण्यात आला. यानुसार देशाच्या पश्चिम किनारपट्टीसह पूर्व, ईशान्य आणि मध्य पूर्व भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
संपूर्ण देशाचा विचार केल्यास या दोन महिन्यांत सरासरीच्या 94 ते 106 टक्क्यांपर्यंत मान्सूनची शक्यता आहे. आग्नेय, वायव्य आणि पश्चिम- मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. खात्याच्या एप्रिलमधील अंदाजानुसार, देशात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या 99 टक्क्यांपर्यंत मान्सूनची शक्यता व्यक्‍तकेली होती.

राज्याच्या विचार करता मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबरपर्यंत मान्सूनने हजेरी लावली होती. तसेच मान्सूनपूर्व व मान्सून उत्तरही जोरदार पाऊस पडला होता. यामुळे पूर्ण वर्षभर पावसाने हजेरी लावली होती. राज्यात गेल्यावर्षी मान्सून काळात 3 हजार 154 मि.मी. तर वर्षभरात एकूण 4 हजार 505 मि.मी. पाऊस पडला होता. मान्सूनचा पाऊस हा सरासरीच्या सहा टक्के जास्त होता.

जुलैतील पावसात घट
राज्यात गतवर्षीच्या तुलनेत जुलैमधील पावसाच्या सरासरीत 89 मि.मी.ने घट झाली आहे. असे असले तरी तो सामान्य सरासरीपेक्षा 124 मि.मी.ने जास्त होता. यावर्षीच्या मान्सून हंगामाचा विचार केल्यास 1 जून ते 1 ऑगस्ट या काळात एकूण 2,018 मि.मी. पाऊस पडला आहे. याकाळात सामान्य सरासरीपेक्षा 25.4 मि.मी. जास्त पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवारी ‘यलो अलर्ट’
गोवा वेधशाळेने येत्या शुक्रवारी, 5 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्‍त करत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान वार्‍याचा वेग ताशी 45 ते 60 कि.मी.पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सामान्यपणे ला-निनाचा प्रभाव कमी असेल तर पाऊस कमी पडतो; परंतु लांब पल्ल्याच्या अंदाजात केवळ त्या एका घटकामुळे पाऊस कमी होणार हे ठामपणे सांगता येत नाही. विविध निकषांचा अभ्यास करून हवामान खात्याने पुढील दोन महिन्यांत गोवा भागात सरासरी किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्‍तकेली आहे.
राहुल मोहन,
शास्त्रज्ञ, गोवा वेधशाळा

Back to top button