गोवा : उमेदवाराला प्रचारासाठी 40 हजार खर्च मर्यादा | पुढारी

गोवा : उमेदवाराला प्रचारासाठी 40 हजार खर्च मर्यादा

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात 10 ऑगस्ट रोजी होणार्‍या पंचायत निवडणुकीसाठी उमेदवाराला प्रचार खर्च मर्यादा 40 हजार ठेवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुकीसाठी प्रती प्रभागात प्रचार करण्यासाठी उमेदवाराला 40 हजार रुपये खर्चाचे बंधन घातले आहे. त्यामुळे 40 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च उमेदवाराला निवडणुकीत करता येणार नाही.

राज्यात 10 ऑगस्ट रोजी 186 पंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत 5038 उमेदवार उतरले असून 64 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सध्या घरोघरी भेटीवर उमेदवारांनी भर दिलेला आहे. मतदारांच्या घरोघरी भेट देण्यासोबतच काहीजन कोपरा बैठका घेऊन आपणास मते देण्याचे आवाहन मतदाराना करत आहेत.

घरोघरी प्रचार 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. त्यामुळे येत्या आठदिवसात मतदाराकडे जाऊन त्यांना आपल्याकडे वळवण्याचे हर प्रकारचे प्रयत्न उमेदवार करणार आहेत.

Back to top button