गोव्यात पावसाने दाणादाण ; म्हापशात महिला गंभीर : अनमोड घाटात कोसळली दरड | पुढारी

गोव्यात पावसाने दाणादाण ; म्हापशात महिला गंभीर : अनमोड घाटात कोसळली दरड

पणजी ः पुढारी वृत्तसेवा राज्यात रविवारी मध्यरात्रीपासून धुवाँधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला. फोंडा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटात दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक तीन तास ठप्प झाली. म्हापसा येथे संरक्षक भिंत कारवर कोसळल्याने महिला गंभीर जखमी झाली. काटे बायणा येथील मलनिस्सारण प्रकल्पाच्या कुंपणाच्या भिंतीचा काही भाग सोमवारी दुपारी कोसळून तीन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. मडगावच्या न्यू मार्केटमध्ये ना धड शेड, ना धड पाणी वाहून जाण्यास नाले, अशी स्थिती असल्याने सुमारे 25 दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले.

पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. महामार्गावरही ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही भागात रस्त्यांना ओहोळाचे स्वरूप आले होते. कंबरेभर पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला व वाहनांची प्रचंड कोंडी झाली. अनेक ठिकाणची वाहतूक दुसर्‍या मार्गाने वळवावी लागली. वाहतूक कोंडी, धुवाँधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शाळांमध्ये जाण्यार्‍या मुलांचे अतोनात हाल झाले. नदीकाठच्या लोकांना अन्यत्र आसरा घ्यावा लागला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून झाडांची पडझड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

पाटो पणजी येथे पाणी तुंबल्याने येथील व्यवहारावर परिणाम झाला. अनमोड घाटात दरड कोसळल्याने तीन तास वाहतूक खोळंबली. म्हापसा येथे संरक्षण भिंत कारवर कोसळून महिला जखमी झाली. काटे बायना वास्को येथे मलनिस्स:रण प्रकल्पाची संरक्षण भिंत कोसळून तीन दुचाकींचे नुकसान झाले. काही ठिकाणी अपघात झाल्याचेही वृत्त आहे. कडशी नदीवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होते.

मडगावच्या नवीन मार्केटमधील 25 दुकानांत पाणी शिरल्याने नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या होत्या. हमरस्त्याखालच्या भुयारी मार्गांत चार फूट पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद राहीली. गोमेकॉ समोरील रस्त्याखालील भुयारी मार्गातही पाणी साचले. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला असला तरी संध्याकाळी पुन्हा पावसाने जोरदार मुसंडी मारली. सर्वाधिक पावसाच्या नोंद म्हापसा भागात सकाळी 8.30 दुपारी 1 दरम्यान 4 इंच झालेली आहे. आत्तापर्यंत राज्यात 46 इंच पावसाची नोंद झाली आहे.

आवेडेत घरावर कोसळले झाड

मडगाव : सोमवारी पडलेल्या जोरदार पावसाने कुडचडे आणि केपेला झोडपून काढले आहे.पावसाचे पाणी तुंबल्यामुळे कुडचडेच्या आंबेडकर सर्कल परिसरात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. आवेडे येथे एका घरावर झाड पडले. धनगरवाडा येथील साकवावरून पावसाचे पाणी वाहू लागल्याने सुमारे चार तासांसाठी धनगरवाड्याचा संपर्क तुटला होता. गुडी येथे पावसाचे पाणी तीन घरात शिरले. त्यामुळे पोर्तुगीजकालीन मातीची घरे कोसळून पडण्याच्या मार्गावर आहे. गुडी पारोडा रस्ता या वर्षीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी परोडा येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतात साचू लागले आहे. सोमवारी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊ लागल्यामुळे केपे आणि मडगाव हा मुख्य रस्ता बुडण्याच्या वाटेवर आहे

‘स्मार्ट सिटी’ जलमय

स्मार्ट सिटीच्या पणजीमध्ये जोरदार पावसाचे पाणी साचल्यामुळे शहर जलमय झाले होते. मिरामार सर्कल, पाटो सर्कल, 18 जून रस्ता, आझाद मैदान परिसर, मळा या भागातील रस्ते पूर्ण पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पणजीतील सांडपाणी व्यवस्था अयोग्य असल्यामुळे पाणी साचत असल्याचे सांगितले जाते, दुसरीकडे मांडवी नदीचे पात्र शहराला समांतर असल्यामुळे मुसळधार पावसाच्यावेळी शहरातील पाणी नदीत जाण्यास वेळ लागत असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

Back to top button