पणजी: आजपासून मुसळधार शक्य | पुढारी

पणजी: आजपासून मुसळधार शक्य

पणजी: राज्यात रविवारी, दि. 3 ते 6 जुलै असे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले दोन दिवस राज्यात पाऊस मुसळधार नाही. पावसाची एक जोरदार सर येते व काही वेळात जाते, त्यानंतर बराच वेळ पाऊस नसतो. हवामान खात्याने व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी, 3 रोजी जोरदार पाऊस पडेल. सोमवारी, 4 पासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे दि.3 ते 6 जुलै या काळात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेले काही दिवस पाऊस शहरी भागात तुरळक हजेरी लावत असून, ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून 5 व 6 जुलै दरम्यान उत्तर महाराष्ट्र-गोवा किनार्‍यावर तासी 45 ते 55 कि. मी. वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 37.6 इंच पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 4 टक्के पाऊस कमी पडलेला आहे. तापमानात घट झालेली असून, पणजीत कमाल तापमान 29 अंश तर किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे.

Back to top button