कणकवली: टोलमाफीसाठी शिवसेना पुन्हा आक्रमक | पुढारी

कणकवली: टोलमाफीसाठी शिवसेना पुन्हा आक्रमक

कणकवली; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पुन्हा एकदा टोलवसुलीच्या हालचाली सुरू केल्याने शनिवारी सकाळी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आ. वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ओसरगाव टोलनाक्यावर धडक देत आंदोलन केले. जोपर्यंत सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी जाहीर केली जात नाही, महामार्गबाधित लोकांचे प्रश्‍न व अन्य समस्या मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोलवसुली सुरू करण्यात येऊ नये अन्यथा होणार्‍या परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल असा इशारा आ. वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणला दिला.

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, रामू विखाळे, राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर,ओसरगाव सरपंच प्रमोद कावले,वागदे सरपंच रुपेश आमडोस्कर, रिमेश चव्हाण,आदित्य सापळे, सिद्धेश राणे, योगेश मुंज, अजित काणेकर, गौरव हर्णे,रोहित राणे, मंगेश राणे, उत्तम लोके, सदानंद मोरे, नितीन धुरी, रवी ठाकूर, बाबू केणी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोलवसुलीचे कंत्राट मिळालेल्या करिमुनिसा या कंपनीला पत्र पाठवून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांचे सहकार्य घेऊन टोलवसुली तात्काळ सुरू करा, अन्यथा आपल्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. त्यामुळे टोलवसुली लवकरच सुरू होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Back to top button