गोवा : सेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॅाटेलमध्ये बोगस कागदपत्रांनी दोघांचे बुकिंग | पुढारी

गोवा : सेनेच्या बंडखोर आमदारांच्या हॅाटेलमध्ये बोगस कागदपत्रांनी दोघांचे बुकिंग

पणजी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार दोनापावला येथील ताज कन्वेंशन सेंटर या हॉटेलमध्ये राहीले होते. याच हॉटेलमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे राहिलेल्या दोघा जणांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळच्या हरियाणा येथील सोनिया दुहान व श्रेय कोठीवाल ही दोघे काल रात्री ताज कन्व्हेंशन सेंटर येथे आले होते. त्यांनी हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग केले होते. आज सकाळी त्यांनी हॅाटेल बुकिंग करतेवेळी जी कागदपत्रे लावली होती ती बोगस असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या नजरेस आले. यानंतर पोलिसांनी संबंधीत दोघांना अटक केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर ३९ आणि इतर अपक्ष असे मिळून ५२ आमदार ज्या हॉटेलात थांबले होते त्याच हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. बोगस कागदपत्रे देऊन दोन व्यक्ती थांबल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कारण शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन केल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांवर मूळ शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या घातपाताची शक्यता व्यक्त होत होती. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला असता हा फक्त योगायोग असल्याचे दिसून आले. वरील दोघेही हरियाणा येथील असून त्यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमदार यांच्याशी काही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button