गोवा : कुर्टी पंचायतीची भव्य वास्तू साकारणार | पुढारी

गोवा : कुर्टी पंचायतीची भव्य वास्तू साकारणार

फोंडा,  पुढारी वृत्तसेवा :   कुर्टीतील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत पंचायतीची भव्य वास्तू साकारण्याचा निर्णय कुर्टी – खांडेपार पंचायतीच्या बैठकीत झाला. ही बैठक स्थानिक आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी सर्व सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

आधीच अरुंद जागा, ग्रामसभा घेण्यासाठी येणारी अडचण, त्यातच दोन ठिकाणी पंचायत कार्यालये यामुळे कुर्टी – खांडेपार पंचायतक्षेत्रातील नागरिकांची अतिशय गैरसोय होत होती. कुर्टी – खांडेपार पंचायतीत शुक्रवारी (दि. 1 जुलै) ही बैठक झाली.  पंचायतीचे प्रशासक देवेंद्र नाईक तसेच पंचायत सचिव, सर्व खात्यांचे अधिकारी तसेच पोलिस व अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते. पंचायतक्षेत्रात सतावणार्‍या विविध समस्यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेषतः वीज, पाणी, रस्ते, मलनिस्सारण प्रकल्प आणि पावसाच्या पाण्यामुळे भरलेली गटारे यामुळे होणार्‍या गैरसोयींवर प्रामुख्याने चर्चा झाली.

कुर्टी भागातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अजूनही सुरू असल्याने स्थानिकांना अतिशय अडचणीचे ठरत आहे. कंत्राटदार केव्हाही येतो आणि रस्त्यांची खोदाई करतो, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यावर सूचना करताना कृषीमंत्री रवी नाईक यांनी हे काम त्वरित संपवा असा आदेश दिला.

कुर्टी – खांडेपार भागातील धोकादायक झाडे कापण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. आठवड्याभरापूर्वी कुर्टी बाजारात रात्रीच्यावेळी अचानक एक झाड कोसळून एकजण गंभीर जखमी झाला होता. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी धोकादायक झाडे कापण्याची सूचना करण्यात आली. त्यावर प्रशासक देवेंद्र नाईक यांनी धोकादायक झाडांची माहिती संबंधित खात्याला देण्यात आल्याचे सांगितले.

कुर्टीतील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत सुमारे तेराशे चौरस मीटर जमिनीत पंचायतीची नूतन इमारत साकारण्यात येणार असून याच ठिकाणी एक मिनी मार्केटही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची सोय होईल, असे सांगण्यात आले. सपना पार्क भागात कायम सतावणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना देण्यात आल्या. इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याबरोबरच नवीन हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील कमकुवत झालेल्या जुन्या साकवाच्या जागी नवीन साकव बांधण्याचेही ठरवण्यात आले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना विशेषतः खांडेपार येथे शाळा विद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर येत असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिस नेमून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी दिले. फोंड्यातील गुन्हेगारी प्रकरणात वाढ झाल्यामुळे पोलिसांनी कार्यक्षमता दाखवावी, अशी सूचनाही त्यांनी पोलिस अधिकार्‍यांना केली.

कुर्टी – खांडेपार पंचायतीतर्फे औषध फवारणीसाठी चार मशिन्स खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, फोंडा तालुक्यात गेल्या मार्च महिन्यापासून डेंग्यूचे 69 रुग्ण नोंद झाले आहेत. हे रुग्ण डेंग्यूसदृष्य असले तरी ते संशयित आहेत, आणि बहुतांश रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली.

फोंडा शहरात दहा तर कुर्टीत आठ रुग्णांची नोंद आहे. त्यामुळे हे रुग्ण वाढू नये यासाठी खबरदारी घ्या, अशी सूचनाही रवी नाईक यांनी केली. बैठकीला माजी सरपंच, माजी पंचसदस्य उपस्थित होते.

 

डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने दक्षता घेण्याच्या सूचना
फोंडा तालुक्यात सध्या डेंग्यू रुग्ण वाढल्याने लोकांत धास्ती पसरली आहे. आधीच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता असल्याने त्यात आता डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी लोकांनी केली होती. यासंबंधी आरोग्यधिकार्‍यांना सूचना करताना रवी नाईक यांनी आवश्यक त्या ठिकाणी औषधाची फवारणी करा, स्वच्छतेसंबंधी जनजागृती करा अशा सूचना केल्या.

Back to top button