एकनाथ शिंदेंचे गोव्यात जल्लोषात स्वागत, आमदारांना घेऊन आज मुंबईत परतणार | पुढारी

एकनाथ शिंदेंचे गोव्यात जल्लोषात स्वागत, आमदारांना घेऊन आज मुंबईत परतणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री गोव्यात पोहोचले. हिंदुत्व आणि विकासकामे या मुद्द्यावर आम्ही सत्तेतून बाहेर पडून पुन्हा सत्तेत आलो आहोत. हा एक ऐतिहासिक क्षण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मोठे मन करून आपल्याला मुख्यमंत्रीपद दिले आहे. त्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री पदाची संधी असतानाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेले महाराष्ट्र भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभारी आहोत. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ‘मातोश्री’वर जाण्याबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काल संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता एकनाथ शिंदे पणजी, दोनापावला येथील ज्या हॉटेलमध्ये त्यांचे समर्थक आमदार राहिले आहेत, या हॉटेलमध्ये ते दाखल झाले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मतदारसंघाचा न होणारा विकास आणि हिंदुत्वाची होणारी गळचेपी यामुळे ज्या ५० आमदारांनी आपणाला साथ दिली आहे, त्या सगळ्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. महाराष्ट्राचा एकूणच विकास पुढील अडीच वर्षांमध्ये केला जाईल. भाजपचे १२० आमदार असतानाही त्यांनी मोठं मन करून आपणाला मुख्यमंत्री होण्याची संधी दिलेली आहे. बाळासाहेबांच्या एका सैनिकाला ही संधी प्राप्त झाली आहे. आमचे ५० आमदार व भाजपचे १२० मिळून १७० आमदार आहेत. त्यामुळे उद्या होणारी बहुमत चाचणी ही फक्त औपचारिकता उरली आहे, असेही शिंदे म्हणाले.

गेल्या अडीच वर्षात आमची जी घुसमट होते होती. त्यातून आम्ही बाहेर पडलो. सहा मंत्री मंत्रिपद सोडून आपल्यासोबत आले. आपल्यावर ज्यांनी विश्वास दाखवला आहे. त्यांच्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नसल्याचे सांगून गोव्यात असलेले आमदार आज संध्याकाळपर्यंत मुंबईत परत येतील, असेही शिंदे यांनी सांगितले. गोव्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सहकारी आमदारांनी शिंदे यांचे जोरदार स्वागत केलं आणि जल्लोषही केला.

Back to top button