ओशेल-शिवोलीत आढळले दोन रशियन युवतींचे मृतदेह | पुढारी

ओशेल-शिवोलीत आढळले दोन रशियन युवतींचे मृतदेह

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा :  उत्तर गोव्यात सध्या मृतदेह सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच काल (गुरुवारी) रात्री उशिरा ओशेल-शिवोलीत दोन रशियन युवतींचे मृतदेह आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली.

उत्तर गोव्यात मृतदेह सापडण्याच्या घटनांमध्ये वाढ

यामध्ये एका २४ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दुसर्‍या घटनेत, ३४ वर्षीय युवती राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली.

पहिल्या घटनेत अलेक्झांड्रा री जावी (२४ वर्षीय) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. मयत युवती ही आपल्या प्रियकारासोबत गुबलावाडा, ओशेल-शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. मृत युवती मानसिकरित्या अस्वस्थ होती आणि औषधे घेत होती, असे पोलिसांनी सांगितले.

छताच्या पंख्याच्या कड्याला गळफास लावून आत्महत्या

काल, गुरुवारी तिच्या प्रियकाराच्या अनुपस्थितीत तिने लाल रंगाच्या साडीच्या साहाय्याने स्वयंपाकघरात छताच्या पंख्याच्या कड्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली असावी.

तिचा प्रियकर जेव्हा त्यांच्या भाड्याच्या खोलीत पोहोचला, तेव्हा त्याला घराचा मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्‍यामुळे संशय आल्‍याने तो छतावर चढला आणि गॅलरीतून खोलीच्या आत शिरला. तेव्हा त्याला हा प्रकार लक्षात आला.

त्यानंतर प्रियकराने मृतदेह खाली उतरवून तिच्या मैत्रिणीला शिवोली आरोग्य केंद्रात हलवले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. हे दोघेही गेल्या एक महिन्यापासून ओशेल-शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहत होते.

दरम्यान, दुसर्‍या घटनेत काल, गुरुवारी सायंकाळी बंदिरवाडा, ओशेल-शिवोली येथेच अजून एका (३४ वर्षीय) रशियन युवतीचाच मृतदेह आढळला. ती आपल्या खोलीत मृत्तावस्थेत होती. एकरेटिना टिटोवा असे मृत युवतीचे नाव आहे.

मृत युवती ही तिच्या बेडरूमध्ये अंथरूणावर निपचित आढळली. ही मृत युवती आणखी एका रशियन युवतीसोबत या भाड्याच्या खोलीत राहत होती. हणजूण पोलिसांनी तपासणी केल्यावर मृत शरीरावर कोणतीही बाह्य जखम आढळली नाही.

पोलिसांनी तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केल्यावर समजले की, दोघांनी १९ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत दारूचे सेवन केले आणि त्यानंतर मृत युवती ही तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली आणि तिची मैत्रीण हॉलच्या आत झोपायला गेली.

त्यानंतर सायंकाळी उशिरा तिची मैत्रीण उठली आणि तिने पाहिले की, एकरेटिना कोणताही प्रतिसाद देत नसल्‍याचे आढळले.

त्यानुसार तिने बेडरूमचा दरवाजा उघडला असता एकरेटिना ही बेडवर निपचित पडलेली दिसली. या दोन्ही प्रकरणी हणजूण पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.

Back to top button