पणजी : मराठी भाषाप्रेमींचा पुन्हा एल्गार | पुढारी

पणजी : मराठी भाषाप्रेमींचा पुन्हा एल्गार

पणजी : पुढारी वृत्तसेवा मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याचा निर्धार मराठी भाषा प्रेमींनी शनिवारी केला. त्यासाठी येत्या 17 जूनला (शुक्रवारी) आझाद मैदानावर धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात मराठी राजभाषा समितीतर्फे बैठक झाली. समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी बैठकीचे नेतृत्व केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, प्रदीप घाडी आमोणकर, प्रकाश भगत, प्रभाकर ढगे, प्रकाश धुमाळ, राजाराम पाटील आदी उपस्थित होते.

गोव्यात मराठी भाषेवर वर्षानुवर्षे अन्याय झालेला आहे. मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा दिलेला नाही आणि तसे वर्तनही केले जात नाही. त्यामुळे सर्व मराठीप्रेमी लोकांनी, तसेच संस्थांनी सरकारला जागे करावे लागेल. त्यासाठी मराठी भाषेचा जागर करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. गो. रा. ढवळीकर म्हणाले, सर्व मराठी भाषा प्रेमींनी, संस्थांनी एकाच मंचावर यावे. आपण एक आघाडी निर्माण करूया. मराठी भाषा प्रेमींचा दबावगट निर्माण करून अन्याय दूर करण्यासाठी झटूया.

खलप म्हणाले, कायद्यामध्ये राजभाषा असा प्रकार नसतो. शासकीय व्यवहाराची भाषा या व्याख्येमध्ये भाषेचा विचार होतो. गोव्यात कोकणी आणि मराठी शासकीय व्यवहाराच्या भाषा आहेत. असे असतानाही मराठीवर अन्याय केला जात आहे. याची सरकारला तीव्र जाणीव करून द्यावी लागेल.

व्यंकटेश नाईक म्हणाले, नवे शैक्षणिक धोरण लागू होत आहे. त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे, हा प्रमुख मुद्दा आहे. त्यामुळे सर्वाधिक वापर होणारी भाषा म्हणून शाळा, महाविद्यालयांतून शिक्षणाचे माध्यम मराठीच करावे, असा ठराव प्रत्येक तालुक्यातून सरकारला पाठविण्याची गरज आहे.

Back to top button