पणजी ः पुढारी वृत्तसेवा : बेळगाव, शिर्डी, कोल्हापूर अशा ठिकाणाहून पर्यटकांना येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवेद्वारे दिल्या जाणार्या हवाई सेवेचा फायदा होऊ शकतो. अशी शहरे या सेवेद्वारे जोडली जाऊ शकतात, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला.
आग्वाद किल्ल्यावर हवाई सेवा देणार्या ब्लेड या खासगी संस्थेद्वारे सुरू झालेल्या हेलि टूरिझम सेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ब्लेड या कंपनीचे संचालक सनी गुगलानी, करणपाल सिंग व पायल सिंग यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात वर्षाला 80 लाख पर्यटक येत असतात. राज्यातील अशी अनेक ठिकाणे आहेत, की त्याठिकाणी पर्यटक पोहोचलेले नाहीत. त्यांनाही अशा ठिकाणी जावे असे वाटते. अशा हवाई सेवांसाठी जर राज्य सरकारच्या काही परवानग्या लागणार असतील तर आम्ही त्या देऊ. दाबोळी विमानतळावरून उत्तर गोव्यात येण्यासाठी हेलिकॉप्टरने केवळ 15 मिनिटांत पोहोचता येणार आहे.