गोवा : ‘हिरोगिरी’मुळे कराडचा तरुण आसगावात गजाआड | पुढारी

गोवा : ‘हिरोगिरी’मुळे कराडचा तरुण आसगावात गजाआड

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : हिरोगिरी करायला गेला आणि गजाआड झाला. कराड (जि. सातारा) येथील तरुणाला ही हिरोगिरी भोवली. सुनिल विजय वाघमारे असे त्याचे नाव आहे.

सुनिल आसगाव येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. गेल्या सहा महिन्यांपासून तो तेथे कॉफी मेकर आहे. दुचाकीवरून तो जात होता आणि त्याने कंबरेत पिस्तुल खोचलेले होते. रस्त्यावरून ये-जा करणार्‍यांना ते दिसत होते. दुचाकीचा क्रमांक कर्नाटक नोंदणीकृत होता. झाले, कोणीतरी त्याचे छायाचित्र टिपले आणि ते समाजमाध्यमात सामायिक केले. महाराष्ट्र, कर्नाटक मधील पर्यटक रस्त्यावरून असे खुलेआम पिस्तुल घेऊन हिंडतात, अशी सडकून टीका नेटकरी करू लागले.

पोलिसांनी मंगळवारी सुनिलला अटक केली आणि भारतीय दंड संहितेच्या 151 कलमान्वये त्याच्यावर गुन्हाही नोंद केला. आसगाव-म्हापसा-थिवी या रस्त्यावरून मित्रासह सुनिल दुचाकीवरून जात होता. मित्राला सुनिलकडे काय आहे, याची काहीच माहिती नव्हती. त्याने कंबरेत खोवलेले पिस्तुल नव्हते तर पिस्तुलासारखे हुबेहुब दिसणारे पिस्तुलवजा लाईटर होते. त्यातील गॅस संपला होता. तो भरून आणण्यासाठी हॉटेलमालकाने त्याला पाठवले होते. हॉटेल मालकाला कोणीतरी हा पिस्तुलाच्या आकारातील लायटर भेट दिला होता. तो लायटर सुनिलला हिरोगिरीमुळे कोठडीत घेऊन गेला.

Back to top button