पणजी; पुढारी वृत्तसेवा : सत्तरी तालुक्यातील वाघेरी डोंगराचे जतन आणि संरक्षण केले जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही वनमंत्री विश्वजित राणे (Forest Minister Vishwajit Rane) यांनी मंगळवारी दिली.
डोंगरावर कोणताही खासगी प्रकल्प होऊ देणार नाही. तेथील बेकायदेशीर कामांवर कारवाई केली जाईल. तसेच जमिनीची गोव्याबाहेरील लोकांना विक्री केलेल्या लोकांवर एफआयआरही दाखल केला जाईल. केरी भागाच्या वनक्षेत्रपालला (आरएफओ) निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली.
एक ध्वनी चलचित्रफीत प्रसारित करून राणे यांनी वाघेरीबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, वाघेरीच्या संरक्षणाला वन खात्याचे प्राधान्य असणार आहे. वाघेरी डोंगरावरील जमीन विक्री व तेथे सुरू झालेल्या काम प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतलेली आहे. केरी विभागाच्या वनक्षेत्रपालसह उपवनसंरक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. राणे म्हणतात, वाघेरी डोंगरावरील कुठलाच प्रकल्प होणार नाही. इको टुरिझमचा विषय वेगळा आहे. कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वाघेरीवरील काम सुरू झाले तसेच जमीन मालकांनी जमिनी विकल्या याची दखल घेऊन कारवाई सुरू केलेली आहे. जमीन मालकावर एफआरआय दाखल करणारच.
मोपासाठी 7,218 झाडे तोडणार; 21,654 लावणार मोपा विमानतळ लिंक रस्त्यासाठी 7 हजार 218 झाडे कापण्यास वन खात्याने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर मोपा परिसरात 21 हजार 654 नवी झाडे पावसापूर्वी लावण्याचे आदेशही वन खात्याने दिले आहेत. मोपा विमानतळ जोड रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापावी लागणार आहेत. वन खात्याने त्याला परवानगी दिली नव्हती. दि. 17 रोजी दिलेल्या परवानगीत धारगळ येथील 3 हजार 258, वारखंड येथील 2 हजार 618 व कासारवर्णे येथील 1 हजार 342 झाडे कापण्यास परवानगी देण्यात आली. संबंधित एजन्सीने झाडे कापल्याच्या बदल्यात त्याच परिसरात 21,654 नवी झाडे लावण्याचे आदेशही कंत्राटदार एजन्सीला वन खात्याने दिले आहेत.