डेंग्यू आलाय... पावसाळा येणार, काळजी घ्या... | पुढारी

डेंग्यू आलाय... पावसाळा येणार, काळजी घ्या...

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
राज्यात डेंग्यू हा संसर्गजन्य आजार काही भागात फैलावलेला आहे. सत्तरी तसेच वास्कोत सध्या डेंग्यूचे रुग्ण आहेत. काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असल्याने लोकांनी डेंग्यूबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्यखाते सक्रिय झाले आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी राज्यात डेंग्यू नियंत्रणात यावा यासाठी वैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन काम करावे, असे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी राज्यातील पंचायती तसेच पालिकामध्ये जाऊन तेथील लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचार्‍यांसोबत संवाद साधावा. ज्या परिसरात डेंग्यूचा फैलाव होण्याचा धोका आहे त्या भागाची पाहणी करून यथोचित उपाय करावेत, असे आदेश आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिले आहेत. दुसरीकडे आरोग्य खात्यासोबतच शहरी विकास खात्याचे मंत्री असलेले राणे यांनी पालिका संचालकांना टिपण पाठवून पालिकांच्या मुख्याधिकार्‍यांना आदेश देण्याची सूचना केली आहे. मुख्याधिकार्‍यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून डेंग्यूसंदर्भात काम करावे, असे आदेश राणे यांनी दिले आहेत.

डेंंग्यू नियंत्रणासाठी सज्जता

आरोग्य खात्याचे सांसर्गिक रोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. उत्कर्ष बेतोडकर म्हणाले, राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात मलेरिया, डेंग्यू नियंत्रणाच्या कामावर कर्मचारी नेमले आहेत. ते गावागावांत जाऊन विशेषता परराज्यातून आलेल्यांची तसेच सांडपाणी साचलेल्या जागी राहणार्‍यांची चौकशी तथा तपासणी करतात. डेंग्यू रुग्ण सापडताच त्याच्यावर उपचार सुरू होतात व डेंग्यू नियंंत्रणाचे उपाय केले जातात.

अशी घ्यावी खबरदारी

  • पाणी उघड्यावर साठवू नये.
  • वाहनांच्या रिकाम्या टायर, रिकाम्या कुंड्या, भांडी यामध्ये पाणी साठवू नका.
  • पाणी नियमित बदलावे.
  • डासांची उत्पत्ती झालेल्या ठिकाणी औषधांची फवारणी करा.

पावसाळा सुरू होताच…

डेंग्यूचा प्रसार हा पावसाळा सुरू होताच म्हणजे जूनच्या शेवटच्या दिवसांपासून ऑक्टोबरपर्यंत होतो. यानंतर हिवाळा सुरू होतो. त्यामुळे डेंग्यूच्या डासांना जन्मास हा ऋतू सुयोग्य राहत नाही. कधी कधी हे डास आणि डेंग्यूचे रुग्ण बर्‍याच महिन्यांपर्यंतही आढळूनही येतात.
टायगर मच्छर डेंग्यू हा एक प्रकारचा व्हायरल ताप (फ्ल्यू) असतो. डेंग्यू हा डास चावल्याने होतो. सामान्य भाषेत या डासांना ‘टायगर मच्छर’ असेही म्हटले जाते. कारण त्यांच्या शरीरावर सफेद आणि काळ्या रेषा असतात. ते घरातील स्वच्छ पाण्यात जन्म घेतात आणि त्यातच अंडीही घालतात. कूलरमध्ये साठलेले पाणी, कुंड्यांमध्ये साचलेले पाणी किंवा पाण्याच्या टाकीत ते जन्मास येतात. साधारणत: हे डास सकाळी आणि दिवसभरात कधीही चावतात.

काय त्रास होतो?

  • अचानक खूप ताप
  • अचानक खूप थंडी वाजणे
  • डोकेदुखी-अंगदुखी
  • डोळे जळजळणे-दुखणे.

Back to top button