म्हापसा बनले ‘ब्लॅक स्पॉट’ | पुढारी

म्हापसा बनले ‘ब्लॅक स्पॉट’

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
येथील नगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ‘ब्लॅक स्पॉटवर’ कचरा टाकण्याचा प्रकार सुरूच आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी गोवा नॉन बायोड्रीग्रेडेबल नियंत्रण कायद्यानुसार अशाप्रकारे ‘ब्लॅक स्पॉटवर’ कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी विनंतीवजा मागणी पालिकेने म्हापसा पोलिसांकडे केली आहे.

सध्याचे प्रभारी नगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांनी यासंदर्भात एक पत्र म्हापसा पोलिस निरीक्षकांना पाठविले आहे. पालिकेने शहरातील वेगवेगळ्या जागी कचरा टाकणारे क्षेत्र ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून जाहीर केले आहे. लोकांनी या ठिकाणी कचरा टाकू नये, यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’चे उद्यानवजा सुशोभीकरण केले आहे. तरीही या ठिकाणी लोकांकडून कचरा टाकला जात आहे. यावर तोडगा म्हणून अशा ‘ब्लॅक स्पॉटवर’ पोलिस कर्मचारी तैनात ठेवावेत व वरील कायद्याचे उल्लंघन करून कचरा टाकणार्‍यांना पकडावे. त्यांच्याकडून दंड वसूल केला जावा, असे या पत्रात नमूद केले आहे.

म्हापसा शहरात अनेक ठिकाणी असलेल्या ‘ब्लॅक स्पॉट’चे पालिकेने सुशोभीकरण केलेले आहे. तरीही लोक त्या ठिकाणी कचरा फेकतात. अशा लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पोलिसांना पत्र पाठवले असून, यामुळे उल्लंघनकर्त्यांवर वचक येईल.
– चंद्रशेखर बेनकर,
प्रभारी नगराध्यक्ष, म्हापसा पालिका

Back to top button