

पणजी : राज्याच्या आरोग्य खात्यातर्फे कर्करोग तपासणी अभियानांतर्गत, सहा महिन्यांत गोव्यात सुमारे 4,500 लोकांची कर्करोग तपासणी करण्यात आली, ज्यात 18 नवे कर्करोगाचे रुग्ण आढळले. गोमेकॉच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र चिंबल आणि युटीसी सांताक्रूझ यांच्या संयुक्त पुढाकाराने रविवारी सांताक्रुझ येथे कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पत्रकारांनी डॉ. काकोडकर यांना कॅन्सर तपासणीबाबत विचारले असता त्यांनी वरील माहिती दिली. सहा महिन्यांच्या तपासणी मोहिमत जे 18 नवे कॅन्सर रुग्ण सापडले आहेत, त्यांना शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन आणि दंत काळजीसह मोफत आणि व्यापक उपचार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. जगदीश काकोडकर म्हणाले, पूर्वी कर्करोग हा एक प्राणघातक आणि असाध्य आजार म्हणून भीती वाटत होती, परंतु अत्याधुनिक उपचार सुविधा आणि लवकर निदान झाल्यामुळे, कॅन्सर रुग्णांचे जगण्याचे प्रमाण खूप सुधारले आहे. या शिबिरांमध्ये आढळलेले सर्व 18 रुग्णांची प्रकृती सध्या चांगली आहे. कर्करोग आता मृत्युदंड राहिलेला नाही, असे डॉ. काकोडकर म्हणाले. सांताक्रूझ शिबिरादरम्यान, गावातील रुग्णांप्रती असलेल्या समर्पणाबद्दल आणि सेवेबद्दल डॉ. अल्बर्ट डिसोझा यांना सन्मानित करण्यात आले. राज्यात कर्करोग जागरूकता आणि उपचारांमध्ये योगदान दिल्याबद्दल आणखी एका डॉक्टरचा सन्मान करण्यात आला.
कर्करोग निवारण केंद्र इमारत बांधकाम सुरु
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने गोव्यात बांबोळी येथे स्पेशालिटी ब्लॉकला लागून एक प्रादेशिक कर्करोग निवारण केंद्र स्थापन करण्यासाठी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. पूर्वी कर्करोग हा एक प्राणघातक आणि असाध्य आजार असल्याची भीती होती, परंतु अत्याधुनिक उपचार सुविधा आणि लवकर निदान झाल्यामुळे जगण्याचे प्रमाण खूप सुधारले आहे. बांबोळी येथील कॅन्सर इस्पितळ सुरू झाल्यानंतर, गोव्यातील रुग्णांना प्रगत उपचारांसाठी राज्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असे डॉ. काकोडकर म्हणाले.