पणजी : भू-माफियांविरुद्ध फास आवळणार | पुढारी

पणजी : भू-माफियांविरुद्ध फास आवळणार

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील टेकडी कापण्यात एका हॉटेल मालकास सहकार्य केल्याबद्दल नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांविरुद्ध रविवारी नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी कडक पावले उचलली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावत भू-माफियांविरोधात आणि कायद्याचा भंग करून जमीन संपादन करणार्‍यांविरोधात कडक पावले उचलण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

नगर नियोजन खात्याच्या नियमांना फाटा देऊन एका हॉटेलला परस्पर टेकडी कापण्याची परवानगी दिलेल्या उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अधिकार्‍यांविरुद्ध आणि हॉटेल पार्क रेगीस कंपनीविरुद्ध मंत्री विश्वजित राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी अधिकारी व हॉटेलविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत मंत्री राणे यांनी सांगितले की, गोव्यातील ज्या भू -माफियांनी नगर नियोजन कायद्याचा भंग करून भू संपादन केले आहे किंवा बेकायदेशीर बांधकामे केली आहेत, त्यांच्याविरोधात विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. हडफडे येथील हॉटेल पार्क रेगीस येथील बेकायदेशीर बांधकाम जागेची रविवारी (दि. 1 मे) सकाळी उपवनसरंक्षक उत्तर गोवाच्या (डीसीएफ) पथकाने पाहणी केली. या पाहणीत कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात टेकडी तोडल्याचे निदर्शनास आले. पथकाने जे पाहिले त्याची माहिती मंत्री राणे यांना दिली.

कारवाईविषयी ठळक बाबी

  • हडफडे येथील हॉटेल परिसरात डीसीएफच्या पथकाने भेट दिली असता तेथे नगर नियोजन खात्याचा परवाना न घेता बेकायदेशीर बांधकाम तसेच टेकडी खोदल्याचे दिसून आले.
  • कोणतीही परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात टेकडी तोडून जागा सपाट करण्याचा प्रकार निदर्शनास आला. हा प्रकार गोवा प्रिझर्व्हेशन ऑफ ट्रीज अ‍ॅक्ट, 1984 चे कलम 8 अंतर्गत गंभीर गुन्हा आहे.
  • टेकडी कापण्यास परवानगी देणार्‍या पीडीएच्या अधिकार्‍यांविरुद्ध आणि कलम 17 चे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश.
  • पीडीए व टीसीपी कायद्यात गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सरकार सादर करेल.
  • गोवा फाऊंडेशनने दाखल केलेल्या खटल्यात तथ्ये न्यायालयासमोर मांडली जातील, याची खात्री सरकार आपल्या प्रतिज्ञापत्रात करणार आहे.

भूमाफियांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. हे सरकार राज्याचे रक्षण करण्यासाठी, लोकांसाठी आहे. कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य झालेले आढळल्यास त्वरित कायदेशीर कारवाई केली जाईल.
– मंत्री विश्वजित राणे

Back to top button