पणजी-चोडण पंधरा मिनिटांत; सौरऊर्जेवरील फेरीबोट सेवा लवकरच | पुढारी

पणजी-चोडण पंधरा मिनिटांत; सौरऊर्जेवरील फेरीबोट सेवा लवकरच

पणजी : विलास ओहाळ
सौरउर्जेवर चालणारी फेरीबोट आता लवकरच सुरू होणार आहे. पणजी ते चोडण या मार्गावर ही बोट सुरू करण्याचा नदी परिवहन खात्याचा मानस आहे. पंधरा ते वीस मिनिटांत मांडवी नदी पात्रातून ही बोट एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचणार आहे. पुढील आठवड्यात ही सेवा चालविण्यावर अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती खात्यातील सूत्रांकडून मिळाली आहे.

नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सौरउर्जेवरील फेरीबोट चालविण्याबाबत शुक्रवारी सूतोवाच केले होते. नदी परिवहन खात्याच्या फेरीबोट कार्यशाळेकडे सौरउर्जेवरील फेरीबोट तयार आहे. ती सेवा कशापद्धतीने चालवावी, यासाठी पुढील आठवड्यात खात्याच्या मंत्र्यासह अधिकार्‍यांची बैठक होणार आहे.पणजी ते चोडण मार्गावर ही बोट चालविली जाणार आहे. पंधरा मिनिटांत ही बोट एका मार्गावरून दुसर्‍या मार्गावर पोहोचणार आहे. मांडवी नदीच्या खालील बाजूस नदी परिवहन खात्याची जेटी तयार करण्यात आली आहे. त्याठिकाणाहून ते थेट चोडण येथील फेरीधक्क्याजवळ ती बोट पोहोचणार आहे. त्या फेरीबोटीसाठी चोडण येथे तरंगती जेटी ठेवली जाणार आहे.

रायबंदर ते चोडण या मार्गावरील फेरीबोटीस जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत ही सौरउर्जेवरील फेरोबोट चोडण येथून पणजीत पोहोचणार आहे. सरकारी कर्मचार्‍यांसाठी ही सेवा फायदेशीर ठरू शकते. रायबंदर ते चोडण मार्गावरील फेरीबोटीस ये-जा करण्यास वेळ लागतो, तेवढ्या वेळेत ती फेरीबोट चोडण येथून पणजी येथे पोहोचणार आहे. सौरउर्जेवरील फेरीबोटीचा फायदा सरकारी कर्मचार्‍यांसह इतर लोकांनाही होणार आहे. त्याशिवाय लोकांचा वेळही वाचणार आहे. चोडण-रायबंदर येथील एखादी फेरीबोट बंद पडल्यास येथे वाहनांच्या रांगा लागतात, गर्दी होते. परंतु ही सेवा सुरू झाल्यास येथील इंधनावरील फेरीबोट सेवेवरील ताण कमी होईल. सौरउर्जेवरील फेरीबोट सेवा मोफत द्यायची की त्यासाठी काही तिकीट दर आकारावा का, याविषयी पुढीलआठवड्यात होणार्‍या बैठकीत निर्णय होईल, असे दिसते.

Back to top button