गोवा : दहा लाखांचे अमली पदार्थ जप्त | पुढारी

गोवा : दहा लाखांचे अमली पदार्थ जप्त

हणजूण : पुढारी वृत्तसेवा: हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी केलेल्या कारवाईत दोघांना अटक करून 10 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. दि.19 रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

उपलब्ध माहितीनुसार हणजूणे येथे अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची खबर हणजूण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हणजूण येथील रॉकी गॅरेजजवळ संशयितरीत्या घुटमळणार्‍या कुर्बान सालार शेख (25, रा. काजुपाडा, बोरिवली (पु.), मुंबई सध्या रा. हणजूण) या पर्यटक युवकास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे 3 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडीएमए हा अमली पदार्थ सापडला. कुर्बान याचेकडे अधिक चौकशी करताना सदर अमलीपदार्थ त्याला शिवोली येथे रहाणार्‍या दिल्लीस्थित महिलेने दिल्याचे समजले.

त्याप्रमाणे हणजूण पोलिसांनी शिवोली पुलाजवळ धाड टाकून एका 29 वर्षीय दिल्ली येथील महिलेला (सध्या रा. पेडणे) ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे सात लाखाचा एमडीएमए हा अमली पदार्थ सापडला. हा अमली पदार्थ ती विक्री करण्यासाठी घेऊन आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्याखाली दोन्ही संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली व दोघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली.

हणजूण पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास, उपनिरीक्षक अक्षय पार्सेकर, महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा सावळ, पोलिस शिपाई गोदीश गोलतेकर, महेंद्र मांद्रेकर, किसन बुगडे, रुपेश आजगावकर यांनी ही कारवाई उपअधीक्षक उदय परब, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button