गोवा : दक्षिण गोव्यात ज्येष्ठ नेत्यांचेच प्राबल्य | पुढारी

गोवा : दक्षिण गोव्यात ज्येष्ठ नेत्यांचेच प्राबल्य

मडगाव : विशाल नाईक
गोव्याच्या दोन जिल्ह्यांपैकी दक्षिण गोवा जिल्हा राजकीय घडामोडी आणि बलाढ्य राजकारण्यांसाठी प्रसिद्ध आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले की राजकीय समीकरणे दक्षिण गोव्यातून हलू लागतात. नवख्या नेत्यांच्या तुलनेत सत्तरीकडे वळलेले नेतेच जास्त राजकीय उलथापालथ माजवतात. यंदाही तीच स्थिती आहे.

निवृत्तीच्या पायरीवर असलेले ज्येष्ठ नेते यंदाची निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सज्ज…
चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो,रवी नाईक आणि दिगंबर कामत हे निवृत्तीच्या पायरीवर असलेले ज्येष्ठ नेते यंदाची निवडणूक लढण्यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. दिगंबर कामत वगळता या सर्वांनी पुन्हा निवडून येण्यासाठी पक्षांतर केलेले आहे. काँग्रेसचे मडगावचे (गोवा) उमेदवार दिगंबर कामत यांचे वय 67 झालेले आहे. सलग तीस वर्षे ते मडगावात आमदार म्हणून निवडून येत आहेत. फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांनी वयाची 74 पार केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री अशा अनेक जबाबदार्‍या त्यांनी पार पडल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखले जात होते. यावेळी त्यांनी पक्षांतर करून भाजपात प्रवेश केला असून, फोंड्यातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस 70 वर्षे वयाचे आहेत.तेही यंदाची विधानसभा निवडणूक लढणार आहेत. लुईझिन फालेरो यांची वाटचाल सत्तरीकडे सुरू असून निवृत्तीच्या विषयाला ठेंगा दाखवत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि भाजपचे दामू नाईक यांच्या विरोधात ते फातोर्डातून निवडणूक लढणार आहेत.

काँग्रेसची दारे बंद झाल्याने त्यांनी भाजपमधून न लढता दुसर्‍या पक्षाचा पर्याय शोधलेले आमदार…

बहुमत मिळूनसुद्धा काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याने गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष आमदारांना घेऊन भाजपने सरकार स्थापन केले होते. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजप सरकार पाडण्यासाठी खलबते सुरू असताना काँग्रेसचे दहा आमदार भाजपला जाऊन मिळाले आणि प्रमोद सावंत यांचे सरकार सत्तेत आले. ज्या काँग्रेसच्या आमदारांनी त्यावेळी भाजपात प्रवेश केला होता त्या आमदारांना आता काँग्रेसची दारे बंद झाल्याने त्यांनी भाजपमधून न लढता दुसर्‍या पक्षाचा पर्याय शोधलेला आहे.

वेळ्ळी मतदारसंघात भाजपसाठी अनुकूल वातावरण नसल्याने फिलिप नेरी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन तृणमूलची वाट धरली आहे. नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.खुद्द भाजपमधून निवडून आलेल्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यंदा आपमधून निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोव्यातील नुवे हा सर्वात नवीन मतदारसंघ आहे.2012 मध्ये या मतदारसंघात पहिली निवडणूक झाली होती. गोवा विकास पक्षाचे मिकी पाशेको या मतदारसंघाचे पाहिले आमदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत पाशेको यांचा पराभव करून काँग्रेसचे विल्फ्रेंड डिसा विजयी झाले होते.2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव आहे. काँग्रेसचे ज्योकीम आलेमाव हा मतदारसंघ सातत्याने जिंकत आलेले आहेत.2012 मध्ये भाजपचे राजन नाईक यांनी आलेमाव यांचा पराभव केला होता; पण 2017 च्या निवडणुकीत पुन्हा कुंकळ्ळी मतदारसंघ काँग्रेसकडे आला. काँग्रेसचे आमदार क्लाफासियो डायस यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. यंदा काँग्रेसने ज्योकीम आलेमाव यांचे पुत्र युरी यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस बरोबर भाजप, आप, तृणमूल आणि अपक्ष असे अनेक उमेदवार यंदा रिंगणात आहेत.

वेळ्ळीवर ‘आप’चा डोळा…

वेळ्ळीत काँग्रेसचा प्रभाव असला तरीही काँग्रेसमधून निवडून आलेले फिलिप नेरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासाठी काँग्रेसची दारे बंद झाली आहेत. त्यांनी भाजपातून निवडणूक न लढवता तृणमूलचा आधार घेतलेला आहे. आप आणि काँग्रेसचा या मतदारसंघात डोळा आहे.

केपेत उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर…

केपे मतदारसंघ जरी गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होता तरीही काँग्रेसला येथेे निवडून देण्यास कारणीभूत ठरलेले उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे आता भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने एल्टन डिकॉस्ता यांना बाबूंच्या विरोधात उतरवले आहे.‘आप’ने राऊल परेरा यांना उमेदवारी दिली आहे.

असे झाले होते 2017 मध्ये…

2017 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोवा जिल्ह्यातील वीस मतदारसंघांत काँग्रेस दहा जागा मिळाल्या होत्या. भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. मगोपतून दोन, अपक्ष दोन, गोवा फॉरवर्डला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली होती.

चर्चिल यांचा प्रत्येक वेळी नवीन पक्ष

तीस वर्षांपेक्षा जास्त काळाच्या राजकीय कारकिर्दीत चर्चिल आलेमाव यांनी युगोडेपा, काँग्रेस, सेव्ह गोवा फ्रंट,तृणमूल काँग्रेस असे अनेक पक्ष बदलेले आहेत. सेव्ह गोवा सारख्या नवीन पक्षांची स्थापनाही त्यांनी केली आहे. प्रत्येक निवडणुकीत नवीन पक्ष असे जणू काही त्यांचे समीकरण आहे. यंदा आलेमाव कुटुंबाने तृणमूलचा आधार घेतला आहे. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कन्या वालांका यांच्यासह तृणमुल पक्षात प्रवेश केला. तृणमूलच्या उमेदवारीवर ते स्वतः बाणावली मतदारसंघातून तर वालांका आलेमाव नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

उत्साही चर्चिल

बाणावलीचे आमदार असलेले चर्चिल आलेमाव हे सध्या 72 वर्षांचे आहेत; पण अजून एखाद्या तरुणाला लाजवेल, असा त्यांच्यात उत्साह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. मुख्यमंत्री, खासदार, बांधकाम मंत्री अशी कित्येक पदे उपभोगताना काँग्रेसच्या सत्तेत अठरा दिवसांसाठी मुख्यमंत्री बनलेले चर्चिल हे पाहिले राजकारणी आहेत. दोन वर्षांसाठी त्यांनी लोकसभेत दक्षिण गोव्याचे प्रतिनिधित्व सुद्धा केले होते.

Back to top button