पणजी : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे माणसाच्या मनावर दडपण वाढत आहे. त्यामुळे ‘ब्रेन स्ट्रोक’सारखे आजार उद्भवत आहेत. राज्यात मागील महिन्याभरात 800 ते 1000 जणांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे प्रकार घडले आहेत. गंभीर बाब म्हणजे यात 30 ते 40 वर्षे वयोगटातील 20 टक्के व्यक्ती आहेत.
ब्रेन स्ट्रोकची वैद्यकीय स्थिती पूर्वी वृद्ध व्यक्तींशी संबंधित होती. आता कमी वयोगटातील लोकांमध्ये ती वाढली आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (गोमेकॉ) मध्ये स्ट्रोकच्या रुग्णांची लक्षणीय वाढ दिसून येत आहे. दरमहा 500 ते 1000 पर्यंत असे रुग्ण दाखल होत आहेत. खासगी इस्पितळातही असे रुग्ण दाखल होतात. हा रोग मृत्यू आणि अपंगत्वाचे जगातील दुसरे सर्वात सामान्य कारण आहे.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. गजानन पाणंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन स्ट्रोकचे रुग्ण दररोज किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त येतात. सर्वात तरुण रुग्ण 27 वर्षांचा होता. एकूण रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण हे 30 ते 40 वयोगटातील आहेत. गोमेकॉच्या न्युरो विभाग प्रमुख डॉ. टेरेसा फरेरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातील 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी आरोग्य तपासणी करण्यावर भर द्यायला हवा. ज्यांना रक्तदाब, मधुमेह, आहे, त्यांनी तर तपासणी करावीच, असे त्या म्हणाल्या. स्ट्रोक, मेंदूचा झटका किंवा अर्धांगवायूची व्याख्या मेंदूच्या ऊतींचे अचानक होणारे नुकसान एकतर रक्तवाहिनीच्या अडथळ्यामुळे किंवा फुटल्यामुळे होते. ही एक न्यूरोलॉजिकल इमर्जन्सी आहे. हृदयविकारानंतर जगातील मृत्यू आणि अपंगत्वाचे हे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे. आनुवंशिक कारणांमुळे स्ट्रोक येऊशकतो. वृद्ध पुरुष आणि रजोनिवृत्तीनंतरच्या महिलांना जास्त धोका असतो.
जीवनशैलीच्या निवडी आणि व्यसने स्ट्रोकला कारणीभूत ठरत असून धूम्रपान, अति मद्यप्राशन, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, तंबाखूचे सेवन, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयाच्या झडपांचे विकार आणि मानसिक तणाव हे सर्व स्ट्रोकची शक्यता वाढवण्यासाठी कारण ठरतात.
‘जागतिक स्ट्रोक दिन’ दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. स्ट्रोक प्रतिबंधकतेबद्दल लोकांना शिक्षित करण्यावर आणि त्वरित उपचारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर जोर देण्यावर या दिवशी लक्ष केंद्रित केले जाते.