

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील हॉटेल चालकास व त्याच्या मुलास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून रोकड काढून घेतल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी जर्मनी टोळीवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तब्बल सातव्यांदा झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
या कारवाईत टोळीचा म्होरक्या आनंदा शेखर जाधव ऊर्फ जर्मनी, त्याचा भाऊ अविनाश शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (दोघे रा. कबनूर), बजरंग अरुण फातले (रा. शास्त्री सोसायटी, लिगाडे मळा), शुभम सदाशिव पट्टणकुडे (रा. लक्ष्मीमाळ कबनूर), अमृत ऊर्फ अमर नारायण शिंगे (रा. रुई), शोएब मेहबूब पठाण (रा. लिगाडे मळा, इचलकरंजी) आणि विवेक ऊर्फ विश्वास लोखंडे (रा. स्वामी मळा, इचलकरंजी) या सातजणांचा समावेश आहे. या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मान्यता दिली आहे.
इचलकरंजी शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी मोका कारवाईचे हत्यार उपसले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच जर्मनी टोळीची गुन्हेगारी कृत्ये सुरूच आहेत. 18 ऑगस्ट 2023 रोजी या टोळीने कोल्हापूर रस्त्यावरील पवन हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालक उमेश मदन म्हात्रे व त्यांच्या मुलास शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यांना चाकूचा धाक दाखवून काऊंटरमधील 7 हजार रुपये काढून घेतले होते. याप्रकरणी बजरंग फातले, अमर शिंगे, शुभम पट्टणकुडे, विवेक लोखंडे यांच्यासह अन्य दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. तपासाअंती सातजणांचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते.
या अनुषंगाने या टोळीवर सातव्यांदा 'मोका' लावत शिवाजीनगर पोलिसांनी हा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्याकडे पाठवला. साळवे यांनी तातडीने हा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे पाठवला. पंडित यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन पुढील मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना सादर केला होता. त्यास रविवारी मंजुरी देण्यात आली. या टोळीतील अविनाश जर्मनी व फातले हे दोघे कारागृहात आहेत; तर अन्य संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे करीत आहेत.