मोरगाव : गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! गणपती बाप्पा, मंगलमूर्ती म्हणताच आपल्या तोंडातून पटकन ‘मोरया’ निघतं; पण गणपती बाप्पासोबत मोरया का म्हणतात, तो कुठून, कसा आला? यामागे एक जुनी कथा आहे.
महाराष्ट्राच्या पुण्यातील चिंचवड या गावामध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्रीगणेशाचे निस्सीम भक्त होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवडपासून दूर 95 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असत. वयाच्या तब्बल 117 व्या वर्षांपर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले; परंतु पुढे वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणं शक्य होत नव्हतं. याचे दुःख त्यांना होते. असे म्हणतात, एके दिवशी गणपती बाप्पाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईन.
दुसर्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले. कुंडामध्ये स्नान करून पूजा करत असताना त्यांच्या ओंजळीमध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती. गणपती बाप्पाने स्वतः त्यांना दर्शन दिले होते. पुढे हीच मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. काही काळानंतर मोरया गोसावी यांनी समाधी घेतली. ही समाधीदेखील या मंदिराजवळच आहे. हे ठिकाण मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते. बाप्पाचे निस्सीम भक्त म्हणून मोरया गोसावी यांचे नाव गणेशाशी अशा प्रकारे जोडले गेले की, लोक फक्त गणपती बाप्पा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया म्हणतात. पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया असे म्हटले जाऊ लागले आणि पुढे देशभरात गणपती बाप्पा मोरया हाच गजर प्रचलित झाला.