सणासुदींची रेलचेल असलेला श्रावण संपतो न संपतो तोच चाहूल लागते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची. गणपती बाप्पा येणार म्हणलं कि त्यांच्या नैवेद्याला गोडधोडाचा खाऊ तर पाहिजेच. तर नेहमीपेक्षा काही वेगळ्या रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यावेळेच्या नैवेद्याला बनवा हटके अशी स्वीट कॉर्नची खीर. पावसाच्या दिवसात गरम गरम स्वीट कॉर्न खायला सगळ्यांना आवडते. पण त्याची खीर कशी करायची ते पाहू.
साहित्य :
स्वीट कॉर्न : 2
फुल क्रीम दूध : अर्धा लि.
साखर : पाव कप
तूप : 1 टेबलस्पून
काजू : 10 - 12
बदाम : 10 - 12
बेदाणे : 1 टेबलस्पून
वेलची : 4
कृती :
स्वीट कॉर्न स्वच्छ धुवून घ्या. नंतर अत्यंत बारीक खीसून घ्या. एका कढई गरम करून त्यात तूप टाका. तूप वितळल्यावर त्यात स्वीट कॉर्नचा खिसलेला पल्प टाका. मध्यम आचेवर परतवून घ्या. या मिश्रणाला तूप सुटू लागले कि गॅस बंद करा. आता दुसऱ्या भांड्यात दूध उकळवून घ्या. काजू, बदाम छोट्या छोट्या तुकड्यात कापून घ्या. वेलचीची पावडर करून घ्या.
दुधाला उकळी आली कि आच मंद करून घ्या. दुधात खिसलेल्या स्वीट कॉर्नची पेस्ट टाका. आता हे मिश्रण सतत ढवळत रहा. दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही याची काळजी घ्या.
आता या मिश्रणात बारीक कट केलेले ड्राय फ्रूटस टाका. यानंतर 12-14 मिनिट खीर ढवळत रहा. सरते शेवटी यात वेलची पावडर घाला. ही खीर चविष्ट लागतेच पण अत्यंत पौष्टिकही आहे.