सिंह : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल | पुढारी

सिंह : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल

आपल्याकडे उदंड आत्मविश्‍वास आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वभावात स्वाभिमान खूप आहे. तेजस्वीपणा, चमकदारपणा, आकर्षकता व भव्यता ही आपल्या राशीची वैशिष्ट्ये आहेत. आपणाला स्वातंत्र्य प्रिय असते. इतर कोणाही व्यक्‍तीच्या हाताखाली काम करणे आपणाला आवडत नाही. इतर कोणाचेही स्वामित्त्व आपण खपवून घेवू शकत नाही. आपल्या स्वत:च्या काही विशिष्ट कल्पना असतात. सत्व आणि स्वत्व हे जपण्यासाठी आपण आग्रही असता. स्वातंत्र्याच्या संदर्भात आपण कोणतीही तडजोड करू शकत नाही. आपण मनाने उदार आहात. परमेश्‍वरानेच जन्मत: आपणाला विशाल मन बहाल केले आहे. 

smileyआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. मागील कालखंडात निर्माण झालेल्या आरोग्यासंदर्भातील समस्या आता कमी होणार आहेत. उत्साह व उमेद वाढणार आहे. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभेल. मागील कालखंडात रखडलेली व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. प्रकृतीची अपेक्षित साथ लाभणार आहे. मागील वर्षापेक्षा हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना चांगले जाणार आहे. १४ एप्रिल ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर,१८ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर हा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरतील. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १७ जुलै ते १६ ऑगस्ट, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड आपणाला आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरू शकतात. १३ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालखंडामध्ये आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. 

smileyव्यवसाय, व्यापार, आर्थिक स्थिती
सिंह राशीच्या व्यक्‍तींना व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी या दृष्टीने हे वर्ष चांगले जाणार आहे. विशेषत: १२ ऑक्टोबर नंतरचा कालखंड असामान्य यशाचा, असाधारण लाभाचा व अनन्यसाधारण  प्रगतीचा असा ठरणार आहे. १ जानेवारी ते ११ ऑक्टोबर हा कालखंड सिंह व्यक्‍तींना व्यवसायामध्ये नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने चांगला आहे. या कालखंडामध्ये तुम्हाला नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. व्यवसायामध्ये नातेवाईकांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. या कालखंडामध्ये मिळणार्‍या संधीचा फायदा करून घ्यावा. १२ ऑक्टोबर नंतरचा कालखंड व्यवसायामध्ये उलाढाल करण्यासाठी, व्यवसायामध्ये नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणण्याच्या दृष्टीने चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यास किंवा व्यवसायाची नवीन शाखा सुरू करण्यास हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. तुमचे व्यवसायातील अंदाज व निर्णय अचूक ठरणार आहेत. व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल. आत्मविश्‍वास, मनोबल, निर्धार व निश्‍चय यांच्या जोरावर आपण या वर्षी व्यवसायात प्रगतीची पाऊले पुढे टाकू शकाल. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, २७ मार्च ते १४ मे, ५ जुलै ते ३० जुलै, २ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर, २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा काळ आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत. २ मार्च ते २६ मार्च, ९ जून ते ४ जुलै या कालखंडात आपण आर्थिकबाबतीत विशेष जागरूक रहावे. फार मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत. नुकसानीची किंवा तोट्याची शक्यता अधिक आहे. या कालखंडामध्ये महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे.

laughनोकरी
सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष नोकरीच्या दृष्टीने यशदायक असे ठरणार आहे. तुमच्या आशाआकांक्षांची पूर्ती होईल. तुमच्या कर्तृत्त्वाला व कर्तबगारीला दाद मिळणार आहे. विरोधकांच्या कारवाया थंड पडतील. हितशत्रुंचे मनसुबे उधळले जाणार आहेत. वरिष्ठांचे तुम्हाला चांगले सहकार्य मिळणार आहे. हे वर्ष नोकरीच्या दृष्टीने अत्यंत यश, समाधान, साफल्य देणारे आहे. यावर्षी आपणाला निराशा येणार नाही. आपल्या इच्छा, आकांक्षा सफल होणार आहेत.  तुमच्या कार्याचे, ज्ञानाचे तुम्हाला फळ मिळणार आहे. नोकरीत समाधानाचे वातावरण राहील. यावर्षी तुमची बढती कोणीही रोखू शकणार नाही. १५ एप्रिल ते १३ जून, १६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर, २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना समाधानकारक जाणार आहेत. १५ फेब्रुवारी ते १३ मार्च, १७ जुलै ते १४ ऑगस्ट, १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर, १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना त्रासदायक ठरणार आहेत. नोकरीतील व्यक्‍तींनी खालील कालखंडात जागरूक रहावयास हवे.  कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींपासून आपण अलिप्‍त रहाण्याची आवश्यकता आहे.

laughप्रॉपर्टी
प्रॉपर्टी, जागा, जमिनी, प्लॉट, फ्लॅट, बंगला, वाहन खरेदी, गुंतवणूक यादृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष अत्यंत सौख्यकारक ठरणार आहे. ंतुमच्या राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. ज्या व्यक्‍ती प्रॉपर्टी, गुंतवणूक, शेअर्स, जागा, जमिनी, बिल्डिंग मटेरिअल, सप्लायर्स या क्षेत्रात आहेत, वाहन क्षेत्रात आहेत त्यांना हे वर्ष अत्यंत यशदायी व प्रगतीचे व लाभाचे ठरणार आहे. गुंतवणुकीला हे वर्ष चांगले आहे. तुमच्या राहत्या जागेच्या, प्रॉपर्टीच्या, वास्तूच्या संदर्भातील कल्पना  या वर्षी सफल होणार आहेत, विशेषत: १२ ऑक्टोबरनंतरच्या कालखंडात आपल्या आशाआकांक्षा पूर्ण होतील. या कालखंडात आपण स्वत:च्या घराबद्दल किंवा व्यवसायाच्या जागेबद्दल असणारी आपली स्वप्ने साकार करू शकाल. १० जानेवारी ते ७ मार्च, ३ मे ते १४ मे, १० जुलै ते २ ऑगस्ट, २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा कालखंड आपणाला प्रॉपर्टीच्या संदर्भात सौख्यकारक आहे. ८ मार्च ते ३१ मार्च, १० एप्रिल ते २ मे, ९ जून ते ४ जुलै या कालखंडात प्रॉपर्टीची कामे विलंबाने होतील किंवा प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येतील. शक्यतो खालील कालखंड प्रॉपर्टी खरेदीच्या दृष्टीने व गुंतवणुकीच्या दृष्टीने टाळणे योग्य ठरेल.

smileyसंततीसौख्य
सिंह राशीच्या व्यक्‍तींना संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. मागील वर्षी २६ ऑक्टोबररोजी शनी धनु राशीत पंचमस्थानामध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी व युवकांनी नको त्या गोष्टींसाठी जास्त वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घेेणे महत्त्वाचे आहे. मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल. या कालखंडात मुलामुलींबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. या कालखंडात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश न मिळाल्यास निराश होवू नये. मानसिक स्थिती काही प्रमाणात कुचंबणेची राहील. तुमच्या छंदाला, तुमच्या अंगभूत गुणाला कमी प्रमाणात वाव मिळणार आहे. स्नेहसंबंधामध्ये काही अडचणी निर्माण होणार आहेत. एक प्रकारचे मनावर दडपण राहणार आहे.  मात्र, मुलामुलींच्या नोकरीचे प्रश्‍न सुटणार आहेत. व्यवसायाचे प्रश्‍न सुटणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येणार आहेत. १ मे ते १४ मे, १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर, १० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने चांगले जाणार आहेत. १ जानेवारी ते १३ जानेवारी, ८ मार्च ते ३१ मार्च, १५ जून ते १० जुलै, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागेल किंवा मुलामुलींच्या जीवनात काही समस्या निर्माण होतील.

heartविवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने व विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जमण्यासाठी हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाणार आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शनी बदलामुळे स्थूलमानाने विवाह जमणे व वैवाहिक सौख्य लाभणे या दृष्टीने हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात असमाधानकारक आहे. हा संपूर्ण कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने कमी-अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेद राहणार आहेत. विशेषत: १२ ऑक्टोबर नंतरच्या काळात ज्यांच्या वैवाहिक जीवनात अगोदरचेच मतभेद आहेत ते या कालखंडात अजून वाढण्याची शक्यता आहेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात जेवढे शांत व संयम राहता येईल तेवढे शांत राहणे गरजेचे आहे. तसेच विवाहेच्छुंचे विवाह सहजासहजी जमणार नाहीत. त्यात विलंब होणार हे जमेलाच धरणे आवश्यक आहे. ५ जुलै ते ३१ जुलै, २ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने समाधानकारक ठरतील. १७ जानेवारी ते ७ मार्च, ११ एप्रिल ते २ मे, ९ जून ते ४ जुलै, १० नोव्हेंबर ते २३ डिसेंबर हा कालखंडत वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

laughप्रवास
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सौख्यकारक ठरणार आहे. प्रवासाचे योग येतील. सहलीचे योग येतील. विशेषत: ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. व्यवसायानिमित्त प्रवास होतील. त्याचप्रमाणे काहींना तीर्थयात्रेचे योग येतील तर काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची तसेच व्यवसायाच्या निमित्ताने परदेशाची संधी लाभेल.  २८ मार्च ते २८ एप्रिल, ५ मे ते ५ जून, २ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने सुखकर आहेत. तर, 
१४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी, ३ मार्च ते २६ मार्च, ९ जून ते ४ जुलै या कालखंडात प्रवासात काळजी घ्यावी. वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत तसेच वाहने अत्यंत काळजीपूर्वक चालवावीत. 

laughसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगली संधी लाभून देणारे ठरणार आहे. हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्‍तींना सुसंधीच्या दृष्टीने अत्यंत चांगले जाणार आहे. विशेषत: ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड तुम्हाला अपेक्षित असणार्‍या कार्यक्षेत्रामध्ये सुसंधी व नावलौकिक लाभणार आहे. विशेषत: बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभणार आहे. तुमच्या हातून लेखन होईल. तुमच्या पुस्तकाची, ग्रंथाची प्रसिद्धी होईल. यावर्षी तुम्हाला विशेष अडचणी जाणवणार नाहीत. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना हे वर्ष खूपच यशदायक ठरणार आहे. तसेच मनोरंजनाच्या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्‍तींना देखील यावर्षी सुसंधी व प्रसिद्धीबरोबर प्रतिष्ठाही मिळणार आहे. शासकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्‍तींच्या दृष्टीने देखील कालखंड चांगला आहे. तुमच्या क्षेत्रातील कष्ट केवळ प्रसिद्धीच्या संदर्भातच संकुचित राहणार नाहीत तर त्यामध्ये आर्थिक लाभही होणार आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वार्थाने चांगले ठरणार आहे. १ जानेवारी ते १६ जानेवारी, २७ मार्च ते १९ एप्रिल, १७ मे ते ६ जुलै, ४ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर खालील कालखंड आपणाला चांगले ठरतील.

laughप्रतिष्ठा, मानसन्मान
प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष असाधारण यशाचे ठरणार आहे. हे वर्ष अलौकिक साफल्याचे असे ठरणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाचे, ज्ञानाचे, अनुभवाचे चीज होणार आहे. तुमची चिकाटी, तुमची बुद्धिमत्ता व तुमचे सार्वजनिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील कार्य याची दखल घेतली जाणार आहे. 
विरोधकावर मात कराल. हितशत्रुंच्या कारवाया यशस्वीपणे उलटवून लावाल. विजयश्री आपल्या गळ्यात माळ घालणारच आहे. प्रसिद्धी लाभणार आहे, यश लाभणार आहे, मानसन्मानाचे योग येणार आहेत. गौरीशंकराचे यश आपणाला यावर्षी मिळणार आहे. वर्षाच्या शेवटी सफलतेचा, यशाचा आनंद आपणाला मिळणार आहे. १५ एप्रिल ते १४ जून, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १८ ऑक्टोबर ते १० डिसेंबर हा कालखंड आपणाला पद, प्रतिष्ठा, मानसन्मान, गौरव, अधिकारपद या दृष्टीने चांगले जातील. १ जानेवारी ते १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, २० जुलै ते १६ ऑगस्ट आणि १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात आपणाला जबाबदारीचे ताणतणाव जाणवणार आहेत. काही बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागेल.

laughसारांश 
सिंह राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्योग, व्यवसाय, व्यापार, कारखानदारी या क्षेत्रात अत्यंत यशाचे, अभ्युदयाचे, प्रगतीचे, विकासाचे ठरणार आहेत. आर्थिक लाभाचे ठरणार आहेत. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक येतील. जनसंपर्क वाढेल. नोकरीत अधिकारपद लाभेल, बढती मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मानसन्मान, अधिकारपदाचे योग आहेत. नवीन वास्तूत जाण्याचा आनंद लाभेल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. यावर्षात वरचेवर आनंदाचे व समाधानाचे प्रसंग येणार आहेत. यश, साफल्य अधिक आहे. मात्र, वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने व संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष आपणास संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. त्यामुळे कौटुंबिक जीवनामध्ये शांत व संयमी राहणे गरजेचे भासेल.

Back to top button