वृषभ : नोकरी, व्यवसायात संमिश्र स्थिती | पुढारी

वृषभ : नोकरी, व्यवसायात संमिश्र स्थिती

 

आपले पाय जमिनीवर स्थिर असतात. व्यवसाय, नोकरी, जागा वरचेवर  न बदलण्याचा आपला स्वभाव असतो. मैत्रीला व शब्दाला आपण पक्के असता. श्रद्धा व निष्ठा या बाबतीत आपण कमालीचे तत्वप्रधान असता. अनुयायी म्हणून आपली रास अत्यंत चांगली असते. आपल्या नेत्याला आपण आपली निष्ठा अर्पण केलेली असते. त्यामध्ये अस्थिरपणा नसतो. घेतलेल्या निर्णयाला चिकटून राहाण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आनंदी व आशावादी आहात. आपल्याला सुखाची अभिलाषा मोठ्या प्रमाणावर असते. शांतपणा हा आपला स्थायीभाव आहे. जीवनाच्या रंगभूमीवरील कोणतेही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडता. कोणतीही जबाबदारी निष्काम भावनेने पार पाडण्याची आपली पद्धत असते. भारतीय युद्धात अर्जुनाच्या रथाच्या घोड्याचे खरारे करण्यास किंवा पांडवांच्या यज्ञ समारंभात काम करण्यात योगेश्‍वर कृष्णाला कमीपणा वाटला नाही. त्याप्रमाणे आपण सर्वत्र निर्मोही व निरपेक्ष बुद्धीने काम करत असता. 

smileyआरोग्य
आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहे. हे वर्ष वृषभ व्यक्‍तींना सौख्याचे ठरणार आहे. आरोग्याच्या फारशा तक्रारी राहणार नाहीत. मानसिक समाधान मिळेल. आरोग्य चांगले राहील. विशेषत: १२ ऑक्टोबरनंतर तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही सकारात्मक दृष्टीने विचार कराल. जीवनाकडे आशादायक दृष्टीने पहाल. सुसंधी मिळणार आहे. कौटुंबिक सौख्य लाभणार आहे. या सर्वांच्या मुळे आपले आरोग्य हे अत्यंत चांगले असणार आहे. आपली मानसिक स्थिती चांगली राहणार आहे व मुळातच आपला स्वभाव प्रसन्न आहे. त्यामध्ये अनुकूल वातावरणाची भर पडणार आहे. सर्वसाधारणपणे १ जानेवारी २०१८ ते ११ ऑक्टोबर या कालखंडात कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. या कालखंडामध्ये काहींची आध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने मुळातच वृषभ राशीच्या व्यक्‍तींना या नशिबवान असतात. यावर्षी गुरू विशेष अनुकूल आहे. त्याचा आरोग्याच्या दृष्टीने फायदा होईल. १५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ३ मार्च ते २६ मार्च, २० एप्रिल ते १४ मे, ९ जून ते ४ जुलै, २ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर ते २५ डिसेंबर हा  कालखंड आरोग्याच्या दृष्टीने सौख्यकारक ठरणार आहे. २७ मार्च ते १९ एप्रिल हा कालखंड आपणाला आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, १५ मे ते ८ जून, १० जुलै ते २५ ऑगस्ट, १२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालखंडात दगदग वाढणार आहे, जबाबदारी वाढणार आहे, कामाचा ताण पडणार आहे. 

smileyव्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती
व्यवसाय, उद्योगाच्या दृष्टीने वृषभ व्यक्‍तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. गुरू आपणाला संपूर्ण वर्षभर अनुकूल आहे. मागील वर्षी २६ ऑक्टोबर रोजी शनीचा आठव्या स्थानात प्रवेश झाला आहे. त्यामुळे शनीची जी अनुकूलता लाभली होती ती आता राहणार नाही. मात्र, गुरू वर्षभर अनुकूल आहे. त्याचा आपणाला फायदा मिळेल. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य मिळविण्याच्या दृष्टीने ११ ऑक्टोबरपर्यंतचा कालखंड चांगला आहे. यावर्षी अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींच्या सहकार्याच्या दृष्टीने १२ ऑक्टोबरनंतरचा कालखंड अधिक चांगला आहे.  व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवीन प्रयोग करू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमचे क्षेत्र व्यापक व विशाल होईल. शनी आठव्या स्थानात जरी गेला तरी त्याची स्वस्थानावर दृष्टी आहे. त्यामुळे फार तोटा होणार नाही. मात्र, तरीही फार मोठे होलसेल व्यवहार करताना बाजारपेठेचा अभ्यास करून मगच निर्णय घ्यावे लागतील. महत्त्वाच्या निर्णयांवर सखोल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. १४ जानेवारी ते २० फेब्रुवारी, १ मार्च ते २६ मार्च, २७ मे २५ जून, २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर हा कालखंड आपणाला आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत. २७ मार्च ते ३० एप्रिल, १० मे ते २६ मे, ११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर या कालखंडात तुम्ही आर्थिक क्षेत्रात काळजी घ्यावी. मोठे आर्थिक व्यवहार करताना फसवणूक होण्याची किंवा तोटा होण्याची शक्यता आहे. १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर, १५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर हा कालखंड आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहेत. या कालखंडात व्यवसायाची कामे मार्गी लागतील. परंतु महत्त्वाचे निर्णय बाजारपेठेचा चौफेर अभ्यास करून घ्यावेत. घाई, गडबडीत कोणतेही निर्णय घेवू नयेत.

laughनोकरी
नोकरीतील वृषभ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले जाणार आहे. हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्‍तींना समाधानकारक व प्रगतीचे ठरणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मात्र, नोकरीमध्ये मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनांवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. कर्तृत्वाला संधी लाभेल. आरोग्याची चांगली साथ लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे. गुरू अनुकूल आहे. काहींना बढतीची शक्यता आहे. वरिर्ष्ठांच्या व थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित यश मिळवू शकाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. अपूर्व मनोबलाच्या जोरावर सतत कार्यरत रहाल. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १५ मार्च ते १३ एप्रिल, १५ मे ते १४ जून, १८ जुलै ते १५ सप्टेंबर, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हा कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना चांगले जातील. १ जानेवारी ते १३ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १३ मार्च, १४ एप्रिल ते १४ मे, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात नोकरीतील व्यक्‍तींनी काळजी घ्यावी. १५ जून ते १५ जुलै, १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर हा कालखंड संमिश्र स्वरूपाचे आहेत.

smileyप्रॉपर्टी
प्रॉपर्टीच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्‍तींना आगामी वर्ष समाधानकारक जाणार आहे. या वर्षी तुम्ही स्वत:च्या घराचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सोडवू शकाल. प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. गेल्या वर्षी रखडलेली प्रॉपर्टीची कामे यावर्षी मार्गी लावू शकाल. यावर्षी प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात अनेक प्रस्ताव समोर येतील. मागील वर्षी ज्या अडचणींना सामोरे जावे लागल्या त्या अडचणी आता कमी होणार आहेत. १४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी, १७ मार्च ते १२ एप्रिल, १७ मे ते १२ जून, १२ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर, १८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर, हा कालखंड यशदायक ठरतील. १ जानेवारी ते १३ जानेवारी, १४ एप्रिल ते १४ मे, १८ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, १८ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.

smileyसंततीसौख्य
संततिसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्‍तींना संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. मुलामुलींच्या शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्‍न काहींच्या समोर उभे राहणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळविण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, मुलामुलींचे नोकरीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मुलामुलींचे एकूणच वर्तन, त्यांची प्रगती, त्यांची अभ्यासातील प्रगती मागील वर्षापेक्षा थोडी विलंबाने होण्याची शक्यता आहे. 
मुलामुलींना अपेक्षित असणार्‍या संधी न मिळाल्यास किंवा अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यास निराश होवू नये. मुलामुलींची प्रगती वेगाने होणार आहे. सातत्याने परिश्रम करत राहिल्यास त्यांना हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. मुलामुलींनी सातत्याने कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. कष्ट घेतल्यास नक्‍कीच यश मिळणार आहे. खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत. २८ जानेवारी ते १४ फ्रेब्रुवारी, ४ मार्च, २१ मार्च, १ एप्रिल ते ५ मे, २७ मे ते ९ जून, २७ जून ते १ सप्टेंबर, २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, ४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा काळ महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व आगामी काळाचे नियोजन करण्यासाठी खालील कालखंड आपणाला उपयुक्‍त ठरतील. १० मे ते २६ मे, ६ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर हा काळ संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत. १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हा कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगला जाईल. तसेच विद्यार्थ्यांना व युवकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. परंतु महत्त्वाचे निर्णय या कालखंडात जाणीवपूर्वक घ्यावेत.

smileyविवाह / वैवाहिक सौख्य
वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक ठरणार आहेे. जवळ जवळ संपूर्ण कालखंड वृषभ व्यक्‍तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. गुरू षष्ठ व सप्‍तमस्थानात आहे. त्यामुळे विवाहासाठी जे गुरूबळ लागते ते गुरूबळ या वर्षी आहे. त्यामुळे  विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जमतील.  वैवाहिक सौख्याच्या दृष्टीनेसुद्धा हे वर्ष चांगले आहे. हे वर्ष वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने विशेष समाधानकारक जाईल.  मागील कालखंडामध्ये असणारे मतभेद मिटवू शकाल. कौटुंबिक जीवना सौख्य व समाधान लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. १८ जानेवारी ते ७ मार्च, ३ मे ते ७ जून, २० जून ते २० ऑगस्ट, १ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत. १ जानेवारी ते १६ जानेवारी, ८ मार्च ते १७ मार्च, १ एप्रिल ते २ मे हा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.

smileyप्रवास / तीर्थयात्रा
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्‍तींना संपूर्ण वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: १२ ऑक्टोबरनंतरचा कालखंड अधिक चांगला जाणार आहे.  विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेश प्रवासाचे योग येतील. तीर्थयात्रेचे योग येतील. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. व्यवसायानिमित्त घडणार्‍या प्रवासांमध्ये काळजी घेणे महत्त्वाचे आहे. २० एप्रिल ते १४ मे, ४ जुलै ते ३ ऑगस्ट, १९ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, २० डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा कालखंड प्रवास, सहली, तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी अनुकूल ठरतील. ८ मार्च ते १९ एप्रिल या कालखंडात प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होण्याची किंवा हरविण्याची शक्यता आहे. 

smileyसुसंधी / प्रसिद्धी व सुयश
सुसंधी, प्रसिद्ध, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष  विशेष समाधानकारक ठरणार आहे. हे वर्ष आपल्या प्रगतीचे आहे, विकासाचे आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. नवीन ओळखी होतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. 
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. आपण आपल्या क्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. कला, संगीत, नाट्य, लेखन, साहित्य, प्रकाशन या सर्व क्षेत्रामध्ये आपणास सुसंधी लाभणार आहे. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. आपले क्षेत्र व्यापक होणार आहे, विशाल होणार आहे. नवीन परिचय होतील.  तुम्ही आपले ग्रंथ प्रकाशित करू शकाल. त्यांना प्रतिसाद चांगला लाभणार आहे. संगीताच्या व कलेच्या क्षेत्रातही आपली वाहवा होणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. एका नव्या क्षेत्रात प्रवेश होवू शकतो. तुमच्या जीवनाला एक प्रकारची झळाळी प्राप्‍त होईल. अनपेक्षित संधी प्राप्‍त होईल. यावर्षी हाती घेतलेल्या कामात निराशा येणार नाही. संपूर्ण वर्षभर सतत सुसंधी, यश आपल्या पदरी पडणार आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी ते १७ मार्च, २० एप्रिल ते २५ जून, १८ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर, ४ डिसेंबर ते २० डिसेंबर हा कालखंड आपणाला सुसंधी व प्रसिद्धी या दृष्टीने यशदायक ठरतील.

laughप्रतिष्ठा, मानसन्मान
प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकारपद या दृष्टीने आगामी कालखंड चांगला जाणार आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, सार्वजनिक, शैक्षणिक, सहकार या क्षेत्रामध्य सहभागी होवू शकल. आपणाला प्रतिष्ठा लाभेल. मानसन्मानाचे योग येतील. गुरू विशेष अनुकूल आहे. त्याचा फायदा होवू शकतो. आपल्या अनुभवाचे चीज होईल. आपण आपल्या कार्याचा व अनुभवाचा ठसा उमटविण्यात यशस्वी व्हाल. ६ फेब्रुवारी ते १४ मार्च, ४ जुलै ते १८ सप्टेंबर, २० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर, हा कालखंड पद, प्रतिष्ठा, अधिकार लाभण्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत. १६ जून ते १५ जुलै, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालखंडात वृषभ व्यक्‍तींनी आपण कोणत्याही गैरकामात अडकणार नाही याची काळजी घ्यावी.

laughसारांश 
वृषभ राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंददायी व आशादायी राहील. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला कष्टाने यश लाभेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे.  अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.  तुम्हाला चांगली संधी प्राप्‍त होणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे क्षेत्र व्यापक होणार आहे. नवे स्नेहसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसाय, उद्योग, आर्थिक लाभ या दृष्टीने वर्ष चांगले आहे. परंतु व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घेणे महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेवू नये. तुमच्या वैचारिक, बौद्धिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.

Back to top button