मीन: हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात सर्वसामान्य स्वरूपाचे  | पुढारी

मीन: हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात सर्वसामान्य स्वरूपाचे 

देवाधर्माची, साधूसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणार्‍यांची ही रास आहे. भावनाप्रधानता व भावुकता ही आपल्या राशीची वैशिष्ट्ये आहेत. विरुद्ध दिशेला तोंड असलेले दोन मासे हे मीन राशीचे प्रतीक आहेत. म्हणून ही राशी द्विस्वभाव आहे. परस्परविरोधी माशांची तोंडे असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्‍तींचा स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा बनलेला असतो.  मुक्या प्राण्यांविषयी, गोरगरीबांविषयी, दीनदुबळ्यांविषयी आपल्या मनात एक प्रकारची कणव असते, दया असते. भूतदयेने प्रेरित होऊन अनाथ लोकांना मदत करण्यात आपला पुढाकार असतो. आपल्यापैकी अनेकांच्या चेहर्‍यावर सात्विक तेज असते. प्रसन्नपणा असतो, शांतपणा असतो. चेहर्‍यावर उदात्ततेची व भव्यतेची झाक असते. आपण अधिक भावनाप्रधान व हळवे आहात. दयाळू, मायाळू व ममताळू आहात. वृत्तीने प्रेमळ आहात. भांडणतंटा न करता सर्वांशी जुळवून घेऊन गोडीगुलाबीने राहण्याचा आपला स्वभाव असतो. आपण आदर्शवादी असता. परमेश्‍वराच्या गूढ शक्‍तीबद्दल आपल्या मनात खूप आकर्षण असते. 

yes आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. यावर्षी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर्षी आपल्या आरोग्याचा स्वामी गुरू हा दि. ११ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अष्टमस्थानात आहे. त्यामुळे प्रकृतीच्या संदर्भात काहीही तक्रारी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्‍ला घ्यावा. यावर्षी चिकाटीने व सातत्यानेच यश मिळणार आहे. तुमच्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे कामाचा ताण व दगदग देखील वाढणार आहे.
 दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड आरोग्याच्या दृष्टीने मात्र अत्यंत चांगला आहे. या कालखंडात आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्यामधील सकारात्मकता वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढेल. सौख्य व समाधान लाभेल. २ मार्च ते २६ मार्च, ३ मे ते १४ मे, ११ ऑक्टोबर ते ३१ नोव्हेंबर हे कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल व सुखावह आहेत. ६ फेब्रुवारी ते १ मार्च, २८ मार्च ते १ मे हे कालखंड आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल असणार आहे. मार्च ते मे च्या कालखंडात आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे या कालखंडात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. या कालखंडात काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. 

yes व्यवसाय, उद्योग, आर्थिक स्थिती

व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा, कारखानदारी, आर्थिक लाभ या दृष्टीने हे वर्ष मीन राशीच्या व्यक्‍तींना संमिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. यावर्षी मीन व्यक्‍तींना चिकाटी व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणे गरजेचे भासेल. सातत्याने यश लाभेल. परंतु प्रगती धीम्या गतीने होण्याची शक्यता आहे. काहीवेळा तुम्हाला तुमची वेळापत्रके बदलावी लागतील. कामे वेळेवर होणार नाहीत. परंतु अशावेळी निराशावादी न होता सातत्याने कार्यरत रहावे. यावर्षी मीन व्यक्‍तींनी नकारात्मक विचार मनामध्ये आणून चालणार नाही. यश मिळणार आहे. परंतु त्यासाठी आपणाला परिश्रम घ्यावे लागणार आहेत. १७ जानेवारी ते ७ मार्च, १० मे ते ८ जून, २६ जून ते २ सप्टेंबर, १२ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर, २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत. १ जानेवारी ते १६ जानेवारी, ८ मार्च ते १ मे हे कालखंड आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल.

yes नोकरी

नोकरीतील मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे राहणार आहे. नोकरीमध्ये आपले जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. आपल्याला अधिकार मिळतील. संधी मिळेल. परंतु दगदग वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. काहींची नको त्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. यावर्षी काहींना नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागेल. नेहमीपेक्षा जास्त जबाबदारीचे ओझे पेलवावे लागणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. परंतु कोणतेही काम करत असताना वरिष्ठांची संमती घ्यावी. वरिष्ठांबरोबर सल्‍लामसलत करावा. दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड नोकरीच्या दृष्टीने चांगला जाईल. नोकरीमध्ये प्रगतीला पोषक वातावरण राहणार आहे. तुमच्या कर्तृत्त्वाला व कर्तबगारीला संधी मिळेल. तुमचे परिश्रम, तुमचा अनुभव याची दखल घेतली जाईल. या कालखंडात पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही घेतलेल्या कष्टांची व परिश्रमांची फळे तुम्हाला या कालखंडात मिळणार आहेत. १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, १५ मार्च ते २० एप्रिल, १ मे ते १४ जून, १७ जुलै ते १६ ऑगस्ट, १७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर हे कालखंड नोकरीतील मीन राशीच्या व्यक्‍तींना प्रगतीचे व बढतीचे आहेत. 

खालील कालखंडात नोकरीतील मीन राशीच्या व्यक्‍तींनी खूप सावधगिरी, काळजी घेतली पाहिजे. खालील कालखंड बरेचसे प्रतिकूल आहेत. अशावेळी वरिष्ठांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. कोणत्याही बेकायदेशीर गोष्टीपासून अलिप्‍त राहिले पाहिजे. १ जानेवारी ते ११ जानेवारी, १३ फेब्रुवारी ते १४ मार्च, १८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर हे कालखंडात हिशत्रुंचा त्रास होवू शकतो. १५ जून ते १६ जुलै, १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर हे कालखंड मीन राशीच्या व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचा राहणार आहे.

yes प्रॉपर्टी
मीन राशीच्या व्यक्‍तींना प्रॉपर्टीच्या दृष्टीने हे वर्षे कमी-अधिक प्रमाणात  संमिश्र स्वरूपाचे राहणार आहे. यावर्षी प्रॉपर्टीच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय जपून घ्यावेत. आपण कोणत्याही व्यवहारामध्ये अडकत नाही याची काळजी घ्यावी. कोणतीही गुंतवणूक करताना त्याच्यावर दहा वेळा विचार करावा. संपूर्ण वर्षभर शनीची चतुर्थस्थानावर दृष्टी असल्यामुळे काहीवेळा प्रॉपर्टीची कामे विलंबाने होतील. तुमची प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भातील वेळापत्रके बदलण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे कागद पूर्ण वाचून मगच सह्या कराव्यात. यावर्षी प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे योग येणार आहेत. परंतु काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. १ जानेवारी ते ६ जानेवारी, २८ जानेवारी ते १२ फेब्रुवारी, ३ मार्च ते ८ मार्च, ५ मे ते ८ जून, २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत. १५ फेब्रुवारी ते २ मार्च, ९ मार्च ते २ मे, ३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर, ११ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर लखंडात प्रॉपर्टी जागा, जमीन खरेदी-विक्री, यामध्ये विलंब होणार आहे. तुम्ही ठरविलेल्या तारखा व तुमचे वेळापत्रक मागे-पुढे होणार आहे किंवा तुमची जी प्रॉपर्टीची कामे चालू आहेत त्यामध्ये विलंब होणार आहे. त्यामुळे या कालखंडात व्यवहार काळजीपूर्वक करावेत. ७ जानेवारी ते २७ जानेवारी, १० जून ते २५ जून, १९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हे कालखंड प्रॉपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे राहणार आहेत.

heart संततीसौख्य

हे वर्ष मीन राशीच्य व्यक्‍तींना संततिसौख्याच्या दृष्टीने कमी-अधिक प्रमाणात समाधानकारक राहील. विशेषत: वर्षाचा उत्तरार्ध हा मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला आहे. वर्षाच्या पूर्वार्धात मुलामुलींना जास्त कष्ट करावे लागतील. जास्त परिश्रम घ्यावे लागतील. पालकांना मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. परंतु दि. ४ मे २०१८ पासूनचा कालखंड हा अनेक दृष्टीने चांगला आहे. या कालखंडात मुलांच्या बौद्धिक व वैचारिक पातळीवर अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
१४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ३ मे ते २० मे, ९ जून ते ३० जुलै, १० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड संततीसौख्याच्या दृष्टीने सौख्यकारक आहेत. ८ मार्च ते ३१ मार्च, ९ एप्रिल ते २ मे हे कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने प्रतिकूल ठरणार आहेत. मुलामुलींच्या संदर्भात काही समस्या निर्माण होतील. 

heart विवाह / वैवाहिक सौख्य 

विवाह, विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात प्रतिकूल ठरणार आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये अगोदरच मतभेद आहेत त्यांनी यावर्षी अत्यंत शांत व संयमी राहणे महत्त्वाचे आहे. यावर्षी मतभेद वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये कटकटींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे वादविवादातील सहभाग टाळावा. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समोरच्याचे म्हणणे ऐकून घेण्याची वृत्ती ठेवावी. विवाहेच्छुंचे विवाह जमण्यामध्ये कटकटी निर्माण होणार आहेत. विवाहेच्छुंचे विवाह सहजासहजी जमणार नाहीत. विवाहेच्छुंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड चांगला आहे. या कालखंडामध्ये अपेक्षित वर किंवा वधू मिळण्याची शक्यता जास्त आहे. ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी, ३ मार्च ते ८ मार्च, ७ मे ते ७ जून, २८ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने समाधानकारक आहेत. ८ जानेवारी ते २८ जानेवारी, १६ फेब्रुवारी ते १ मार्च, १० मार्च ते ३० एप्रिल, ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या  कालखंडात वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत ते मतभेद खालील कालखंडात वाढणार आहेत.

yes प्रवास
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सामान्य स्वरूपाचे ठरणार आहे. वर्षाचा पूर्वार्ध म्हणजेच एप्रिल 2018 पर्यंतच्या कालखंडात जास्त जागरूक रहावे. प्रवासात काळजी घ्यावी. वस्तू गहाळ होणार नाही किंवा हरविणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये इजा  होणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु वर्षाचा उत्तरार्ध हा अनेक दृष्टीने चांगला जाईल. तीर्थयात्रेचे योग येतील.  विशेषत: दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. या कालखंडात प्रवासाची संधी येणारच आहे. काहींना शिक्षणाच्या निमित्ताने, काहींना व्यवसायाच्या निमित्ताने परदेश वारी घडेल. हा कालखंड प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत सुखकारक आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी, ४ मार्च ते १२ मे, ९ जून ते ४ जुलै, ११ ऑक्टोबर ते २० डिसेंबर हे कालखंड प्रवास, तीर्थयात्रा यादृष्टीने चांगले आहेत. १ जानेवारी ते १३ जानेवारी, ६ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी, १५ मे ते ८ जून, ५ जुलै ते १० ऑगस्ट हे कालखंड प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. 

yes सुसंधी / प्रसिद्धी व सुयश

सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य राहणार आहे. तुम्हाला यावर्षी तुमच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने, तुमची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने थोडे जास्त परिश्रम घ्यावे लागणार आहेत. संधी लाभणार आहे. परंतु ती काही वेळा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसण्याची शक्यता आहे. अपेक्षेप्रमाणे संधी न मिळाल्यास काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवण्याची शक्यता आहे. परंतु आपण निराश होण्याचे काहीच कारण नाही. 

दि. १२ ऑक्टोबर नंतर तुमचा जनसंपर्क वाढेल. नवीन परिचय होतील. या कालखंडात काहींना अनपेक्षितरीत्या, नाट्यमयरीत्या चांगली संधी लाभेल. तुमच्या यशाचा इतरांना हेवा वाटेल. यशाचा गौरीशंकर यावर्षी तुम्ही गाठणार आहात. नेत्रदीपक यश मिळवून इतरांना आश्‍चर्यचकीत कराल.  नवीन स्नेहसंबंध जुळतील. स्वप्ने व मनोरथ सिद्धीला जातील. या कालखंडात तुमचा जनसंपर्क वाढेल. मानसिक प्रसन्नता राहणार आहे. १७ जानेवारी ते ७ मार्च, २० मार्च ते १४ मे, २७ मे ते ९ जून, १२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर, १२ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर हे कालखंड सुसंधी व प्रसिद्धीच्या दृष्टीने चांगले आहेत.

yes प्रतिष्ठा, मानसन्मान

प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य स्वरूपाचे राहणार आहे. यावर्षी आपली चिकाटी वाढणार आहे. आपण सातत्याने कार्यरत रहाल. परिश्रम व कष्ट घ्यावे लागतील. जबाबदारीमध्ये वाढ होईल. सार्वजनिक व सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी व्हाल. परंतु अपेक्षित यश मिळण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य स्थिती राहणार आहे. यावर्षी फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नये व आपण कोणत्याही प्रकरणात अडकणार नाही याची काळजी घ्यावी. 

दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतर मात्र ग्रहमान अत्यंत चांगले आहे. गुरू चांगला आहे. त्यामुळे या कालखंडात आपणाला यश लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण, सांस्कृतिक क्षेत्र, कला, संगीत, नाट्य, चित्रपट या सर्व क्षेत्रामध्ये एखाद्या मंडळावर तुमची नेमणूक होईल. १५ मार्च ते १४ मे, १७ जुलै ते १६ ऑगस्ट, १८ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर हे कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने प्रगतीचे आहेत.

सारांश 

मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष कमी-अधिक प्रमाणात सर्वसामान्य स्वरूपाचेच ठरणार आहे. यावर्षी आपल्यावरील जबाबदारीचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे कामाचा ताण व दगदग देखील वाढणार आहे. यावर्षी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यावर्षी कोणतेही महत्त्वाचे निर्णय हे अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेवू नयेत. भागीदारी व्यवसायात कमी-अधिक प्रमाणात कटकटी राहणार आहेत. भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय सर्वांच्या संमतीने घेणे जास्त योग्य ठरेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने मे ते ऑक्टोबर पर्यंतचा कालखंड चांगला आहे. 

विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने, संततिसौख्याच्या दृष्टीने, आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने दि. १२ ऑक्टोबर २०१८ नंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे. या कालखंडात आपल्याला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. या कालखंडात आपणाला पगारवाढीची शक्यता आहे. या कालखंडात गुरूवर्यांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. प्रवास सुखकर होतील. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला अधिक कष्ट घ्यावे लागले, परिश्रम करावे लागले, जबाबदारीने कार्यरत रहावे लागले तरीही वर्षाच्या शेवटी या सर्वांचे फळ आपणाला लाभणार आहे. 

Back to top button