ब्लॉग : मासिक पाळीविषयी व्हावी खुली चर्चा | पुढारी

ब्लॉग : मासिक पाळीविषयी व्हावी खुली चर्चा

पूजा कदम : पुढारी ऑनलाईन

ती शाळेतून अचानक घरी आली. कोणाशीच काहीही न बोलता तिनं खोलीत जाऊन दार बंद केलं. बराच वेळ उशीत डोकं खुपसून रडत होती. आईला जेव्हा ती आल्याचं समजलं तेव्हा आई रूमजवळ गेली आणि दार वाजवू लागली. आई येताच ती उठली आणि आईला बिलगुन रडू लागली. आईने तिच्याकडं पाहिलं. तिच्या शाळेचा ड्रेस लालेलाल झाला होता. आईला समजायचं होतं ते समजलं, आईने तिला स्वच्छ अंघोळ घातली आणि जवळ बसवून तिला समजावू लागली. पण, ती घाबरली होती. हा सर्व प्रकार काय आहे…माझ्यासोबत अस का झालं …मला शाळेत मुलांनी का चिडवलं, असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. हा किस्सा आहे वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीचा.

लवकरच रिलीज होणाऱ्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटामुळं या दबलेल्या विषयाला वाचा फुटलीय. अक्षय कुमार मनावर कोणतंही दडपण न आणता हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन चित्रपटाचं प्रमोशन करतोय. त्यानं फक्त अभिनय म्हणून हा चित्रपट केला नाही, तर समाज आणि स्पेशली मुलांनी मासिक पाळीकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असं त्याला वाटतं.

आपल्याकडं मुली वयात येण्यापूर्वी त्यांना याची माहिती देण्याची पद्धतच नाही. हा सगळा प्रकार घडल्यानंतर भेदरलेल्या मुलीला हे समजावून सांगितलं जातं. शाळेत किंवा एखाद्या कार्यक्रमात असताना अचानक रक्तस्राव सुरू होतो. आईला याची कल्पना असते मात्र ती काहीच बोलत नाही. हा त्रास प्रत्येक महिन्याला होणार हे ऐकून मुली जास्तच घाबरतात. खरं तर यात घाबरण्यासारखं काहीच नाही. फक्त मुलींच्या मनातील भीती मोडण्यासाठी आई आणि मुलींमधील संवाद गरजेचा आहे. शहरी भागात काही प्रमाणात आई व मुलीची चर्चा होते. पण, ग्रामीण भागात यावर बोलणं म्हणजे पाप समजलं जातं. पहिल्या मासिक पाळीवेळी तिला समजून न घेता बाजूला बसवलं जातं. तिने एखादा घोर अपराध केल्यासारखी वागणूक दिली जाते. याकाळात मुलींना आराम मिळावा अशी समजूत आहे. पण या काळात तिला जास्त गरज आरामाची नाही तर आधाराची असते. त्या काळात तिला होणारा त्रास कमी करणं गरजेचं असतं. मासिक पाळी बद्दल आणि त्या काळात घ्यावयाच्या काळजीबद्दल आजही बंद खोलीत तेही दबक्या बोललं जातं. या चित्रपटामुळे का असेना या विषयावर उघडपणे बोललं जातंय.

मुलींना पाळी सुरू झाल्यानंतर ती अनियमित असते. पहिल्याच पाळीत कधी जास्त रक्तस्त्राव होतो तर कधी होतही नाही. तर काही वेळा पहिले तीन दिवस रक्तस्राव होतो आणि बंद होतो पुन्हा ८ ते १५ दिवसांनी रक्तस्राव सुरू होतो असे प्रकार होतात. यामुळे पालक काळजीत पडतात. अशा वेळी पालकांनी घाबरून जायची गरज नाही. पण अतिरक्तस्त्राव होत असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते.

हा झाला मुलींच्या मासिक पाळी सुरू होण्याचा काळ. पण, खरी कसोटी तर यानंतरच्या काळात असते. मासिक पाळीमध्ये मुलींची काळजी कशी घ्यावी याबद्दल जनजागृती होणं गरजेचं आहे. या काळात मुलींना कापड वापरायला दिलं जातं. पण ते कापड स्वच्छ आहे का ? तसेच दुसऱ्यावेळी तेच कापड वापरायचे का ? याबाबद्दल अनेक पालक काळजी घेत नाहीत. पुन्हा पुन्हा तेच कापड वापरल्याने मुलींना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे मुलींना सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मासिक पाळीमध्ये सॅनिटरी नॅपकिन जितकं गरजेचं आहे तितकेच ती गोष्ट तुमच्या मुलांना समजून सांगणही गरजेचं आहे. मुली वयात येताना त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव त्याच वयातील मुलांनाही करून द्यायला हवी. मुलींसाठी ही गोष्ट जशी नवी आहे तशीच मुलांसाठीही आहे. कदाचित मुलींना या काळात होणारा त्रास माहीत नसल्याने ‘मासिक पाळी’ हा विषय मुलांमध्ये चेष्टेचा विषय ठरतो. पण याच वास्तवाची जाणीव मुलगा आणि मुलगी यांना करून द्यायला हवी नाहीतर हे चुकीचे गैरसमज त्यांच्या मनात घर करून बसतात. मुलं आणि मुलींचे शारीरिक बदल त्यांना समजवण्यासाठी आई वडील आणि शिक्षक मदत करू शकतात. नाहीतर वयाने मोठ्या असणाऱ्या मित्रांच्या सहवासात गेल्यानं चुकीचं मार्गदर्शन मुलांना मिळण्याचा धोका असतो.

‘माझ्या एका मित्राची गोष्ट मला सांगायची आहे. त्याच्या मुलीला रात्री ११ च्या सुमारास पाळी सुरू झाली. यांनातर तिनं आईला सांगितलं. इतक्या रात्री नॅपकिन आणायला कोण जाणार हा प्रश्न होता.यामुळं आई तिला वापरण्यासाठी कापड देते. तेवढ्यात तिचे वडील या दोघींची सर्व चर्चा ऐकतात. ते खोलीत जातात व मुलीला म्हणतात चल आपण घेऊन येऊ नॅपकिन. मुलीची गरज असल्यानं ती लगेच उठते. ते दोघे नॅपकिन घेऊन येतात. या प्रसंगानंतर त्या दोघांचं नातंच बदलून गेलं.त्या दिवसानंतर त्याची मुलगी कोणतंही अंतर न ठेवता या विषयावर बाबाशी बोलू लागली. हा किस्सा अक्षयच्या एका मित्राचा आहे. पॅडमॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई आयआयटीमध्ये आल्यानंतर त्यानं हा किस्सा विद्यार्थ्यांना सांगितला. 

मासिक पाळीमध्ये मुलींच्या शरीरातील दूषित रक्त बाहेर टाकण्याची क्रिया घडते. या प्रक्रियेला अनेक नानाविध विशेषणे जोडून त्याची चुकीची संकल्पना नव्या पिढीसमोर मांडली जाते. वयात येणाऱ्या मुलींना योग्य ते मार्गदर्शन दिलं जात नाही. शहरीभागात या विषयी बोलणं हे सकारात्मक असलं तरी ग्रामीण भागात मात्र गंभीर परिस्थिती दिसते. ग्रामीण भागातील महिला आणि मुली आजही परंपरेच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. मासिक पाळी आली की ४ दिवस घरीच रहा, शिवाशीव करू नको, इतकेच काय तर कोणावर सावटही पडू देऊ नको, असा विचार करणाऱ्या महिला सॅनिटरी नॅपकिन वापरायला नकार देतात. 

ग्रामीण आणि शहरी भागात मुलींना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यात अडथळा ठरणारी एक गोष्ट म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती. सॅनिटरी नॅपकिन परवडतील अशा दरात उपलब्ध असले तरी काहीवेळा काही अडचणींना सामोरं जावं लागतं. भारत हा पुरूषप्रधान देश आहे. इथं आर्थिक बाजू सांभाळण्याचं काम घरातील पुरूष करतात. यामुळं मुलीला सॅनिटरी नॅपकिन वापरायचे असेल तर, तो निर्णयही कर्त्या पुरूषावर अवलंबून असतो. या सर्व विचारांमधून फक्त मुलींची काळजी लक्षात ठेवून त्यांना सॅनिटरी नॅपकिनच वापरण्यास द्यावेत. हेच त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. 

पॅडमॅनच्या निमित्ताने या विषयाला वाचा फुटली आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी ट्विंकल हिने केली आहे. तिने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये जाऊन या चित्रपटाचे प्रमोशन केले. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिच्याशीही ट्विंकलने संवाद साधला. मलालासोबत सॅनिटरी नॅपकिन घेऊन ट्विंकलने एक फोटो शेअर केला होता. त्यावरून काही कट्टर पंथियांनी मलाला हिला धमक्या दिल्या. सोशल मीडियावर तिला ट्रोलही केले. हे कितपत योग्य आहे? एखादा समाज, या विषयावरून मुलीला ट्रोल करत असेल, धमक्या देत असेल, तर खरचं या विषयावर अधिक खुली चर्चा होणं गरजेचं आहे, असं वाटतंय.

Back to top button