त्या वळणावर... | पुढारी | पुढारी

त्या वळणावर... | पुढारी

त्या वळणाने.. कसा कुणास ठाऊक घात केला. आयुष्य अन् जीवनाचा क्षणात अंत झाला. खंबाटकी बोगद्याजवळील त्या एस वळणाने आजपर्यंत अनेक अपघात  पाहिले. शेकड्याने जीव घालवले, त्यांचे संसार उदध्वस्त केले. किती वेळा भयावह आघातांनी,काळीज थरारलं, शहारले असेल. केवळ कल्पनांनी अंगावर काटा उभा राहतो ना.  प्रत्येकालाच आयुष्यात अशा अनेक वळणांना सामोरं जावं लागतं.

जीवन अनेक अनुभवाच्या  वळणांनी पुढे सरकत असते.  कधी अनपेक्षीत वळण येते आणि आयुष्यालाच कलाटणी देतं. काही वळणांवर आयुष्य  धोका खावून वाचतं तर काही वळणावर प्रयत्न करुनहीआयुष्याचा शेवट होतो. खरंतर आयुष्य हे असंच असतं. काही गोष्टी अ ापल्या हातात असतात तर काही मात्र आवाक्याबाहेर जातात. आपण मात्र उगीचच अकांडतांडव करत बसतो.  

एक वळण कुणाचे करिअर घडवते तर कुणाचे  करिअर उदध्वस्त करते. वळणांची हीच तर कोडी, त्याचे सीक्रेट माणसाला सुटतीलच, असे नाही.  धोकादायक वळणं पार करुन जाण्यातच आपली खरी कसोटी असते. एखाद्याच्या हातून चुकीने ‘व्हील’ फसले तर…  

‘एस’ वळणात  अनेकांची आयुष्यं पणाला लागलीत. कुणी स्वर्गात तर कुणी दवाखान्यात, कुणी आयुष्यभर मरण यातना सोसते. 

‘घडू नये ते घडून गेले, वैरीण ती वेळ, सारे संपून गेले’

फक्त आयुष्याचा पालापाचोळा झाल्यावर मन खिन्न होते.  क्षणभंगुर आयुष्याची कीव येते. वळणंच जर बदलता आली असती तर? पण सगळं सरळमार्गी असेल तर मजा नाही वळणवाट आहे म्हणूनच जीवनघाट आहे. तो पार करण्यातच यश आहे. भविष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणाला एक वळण  दडलंय. ते पार करायला शिका. धीरानं खंबीर मानसिकतेने वळणाच्या पुढेच तुम्हाला हवे असलेलं  तुमचं धेय नक्कीच तुमची वाट पहात असेल.

– चंद्रकांत लोखंडे

Back to top button