स्पर्धा परीक्षेचे स्वरुप जाणून घ्या  | पुढारी

स्पर्धा परीक्षेचे स्वरुप जाणून घ्या 

हाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. हे तीन टप्पे म्हणजे पूर्व, मुख्य आणि मुलाखत. 2013 पासून आयोगाने राज्यसेवा परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची आहे. याचाच अर्थ प्रश्‍न व त्याखाली दिलेले पर्याय वाचून योग्य उत्तराचा पर्याय छायांकित करायचा आहे. या परीक्षेत चुकीच्या उत्तराला दंड म्हणून 1/3 गुण वजा केले जातात. ही परीक्षा फक्‍त पात्रता चाचणीच्या स्वरुपाची आहे. 

पूर्व उत्तीर्ण झाल्यानंतर येणारा दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा होय. 2011 पर्यंत मुख्य परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रम आणि गुणांची विभागणी वेगळ्या स्वरुपाची होती. 2012 मध्ये एमपीएससीने राज्यसेवा मुख्य परीक्षेचे गुण, अभ्यासक्रम आणि स्वरुप यात बदल केले. यानुसार राज्य सेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळण्यात आले. नव्या पॅटर्नप्रमाणे मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी 100 गुणांचे दोन अनिवार्य भाषा पेपर, तर सामान्य अध्यनाचे इतिहास-भूगोल, राज्यघटना-राज्यकारण, मानव संसाधन विकास-मानवी हक्‍क आणि अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान असे पेपर समाविष्ट केले आहेत. प्रत्येक पेपरला 150 मार्क आहेत. मुख्य परीक्षेतील महत्वपूर्ण बदले म्हणजे ही परीक्षा देखील पूर्व परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची आहे. प्रत्येक पेपरमध्येही 150 प्रश्‍न 150 गुणांसाठी विचारण्यात येतात. जुन्या पॅटर्नचे लघुत्तरी, दीर्घोत्तरी स्वरूप बाजूला ठेवून ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची करण्यात आली  आहे. 2016 पासून मुख्य परीक्षेतील  मराठी  व इंग्रजी या पेपरचे स्वरूप देखील 50 गुण वस्तुनिष्ठ आणि 50 गुण वर्णनात्मक असे केले आहे.

– अनुप धुमे, युनिक अ‍ॅकॅडमी,सांगली. 

Back to top button