चॅट नव्हे आता पैसे देखील पाठवा WhatsApp वरून! | पुढारी

चॅट नव्हे आता पैसे देखील पाठवा WhatsApp वरून!

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

जगभरातील सर्वात लोकप्रिय मेसजिंग अॅप  WhatsApp वरून पुढील आठवड्यापासून पैसे पाठवता येतील. फेसबुकने यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे आता चॅटसोबत WhatsAppवरून पैसे देखील पाठवता येतील. 

भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरु करण्यामागे फेसबुकला WhatsApp बाजारपेठेतील हिस्सा आणखी मजबूत करायचा आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत पेटीएम, गुगल पे आणि मोबिक्विक सारख्या कंपन्या असून यांच्यात जोरदार टक्कर सुरु आहे. अशातच जर WhatsAppने देखील पेमेंट सर्व्हिस सुरु केली तर स्पर्धा आणखी वाढेल. नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये UPI पेमेंट्सची संख्या वाढून ती 190 मिलियनवर पोहोचली आहे.  

  

WhatsAppने पेमेंट सर्व्हिससाठी HDFC,ICICI आणि अॅक्सिस बँकेसोबत करार केला आहे. यामुळे तातडीने पैसे पाठवता येणे शक्य होणार आहे. पेमेंट सर्व्हिससाठी WhatsApp लवकरच स्टेट बँक ऑफ इंडियासोबत देखील करार करणार आहे. 

फेसबुकने याआधी WhatsApp Pay चे पायलट व्हर्जन फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केले होते. हे व्हर्जन 10 लाख युजर्सनी वापरले होते. WhatsAppचे भारतात मोठ्या प्रमाणात युझर्स आहेत आणि या पेमेंट सर्व्हिसचा त्यांना फायदा होईल असा विश्वास फेसबुकला आहे.

सध्या भारतात 20 कोटींपेक्षा अधिक लोक WhatsAppचा वापर करत आहेत. ही संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या इतकी आहे. WhatsApp ने मार्च 2018मध्ये भारतीय युझर्ससाठी transact Via QR हे फिचर सुरु केले होते.

क्रेडिट सुइसच्या एका अहवालानुसार भारतातील डिजिटल पेमेंटची बाजारपेठ सध्या 200 अब्ज डॉलर्सची आहे. ज्यात 2023पर्यंत पाच पट वाढ होणार आहे. 

 

Back to top button