बदलली रेशीम धाग्याची वीण | पुढारी | पुढारी

बदलली रेशीम धाग्याची वीण | पुढारी

भारतीय सण आणि परंपरा ही प्रत्येक येणार्‍या सणाला अधिक समृद्ध करणारी नात्यांची वीण घट्ट करणारी आणि महत्त्वाचे म्हणजे समाज एक करणारी प्रक्रिया आहे.  नात्यातील नवे परिमाण देणार्‍या या सणांचे महत्त्व हे भारतीय परंपरेचे मानदंड आहेत. निसर्गाने कूस बदलून पावसाच्या सरी धरतीला न्हाऊ घालताना सृजनांची आस लागून राहिलेल्या प्रत्येक घटकांमध्ये चैतन्य भरून येते. काळाप्रमाणे सण हळूहळू मॉडर्न होऊ लागाले. पारंपारिक नात्यांमध्ये आधुनिकता येऊ लागली. सणांचे इव्हेंट झाले. त्यातील गहिरेपणा कमी होऊन उथावळेपणा येऊ लागला. औपचारिक्ता येऊन केवळ एक उपचार होऊ लागला. सणांचे महत्त्व अमूक डे, तमूक डे म्हणून साजरे होऊ लागले.

भावा-बहिणीच्या नात्यातील दरी वाढून ती व्हॉटस्अ‍ॅपवर राखी पाठवून साजरे होऊ लागले.  टीव्हीवरील जाहिराती बघून कुछ मिठा हो जाये, या पलिकडे गोडी उरली नाही.  मनगटावरील धाग्यांची जागा विविध शोभेच्या नक्षीदार धाग्यांनी घेतली. साडी-चोळी भेट देण्याच्या परंपरा  मागे  पडून मोबाईल, घड्याळ, सुवर्ण अलंकार देण्याची प्रथा प्रचलित होऊ लागली.  मनाने घट्ट असलेली नाती कॅमेर्‍यात सेल्फी  म्हणून डीपी बंद झाली. 

नात्यांनी अधिक समृद्ध होण्यासाठी  भावनेचा  ओलावा हवा.  प्रेमस्नेह, आपुलकी, जिव्हाळा, गोडवा ही नात्यांची गरज आहे. आपण कितीजरी आधुनिक झालो तरी आपल्यातील माणूसपण जिवंत रहायला हवे. ही नाती केवळ रक्ताची नसतात तर ती मनाची असतात. अशा मनाच्या गरजेसाठी मनानी एकत्र येण्याची गरज आहे. आणि मनाने एकत्र येऊन साजरे केलेल्या सणांना सेल्फीची गरज नसून ती आंतरमनात कायमस्वरूपी सुगंध देत राहतात. अशा नात्यांकडे आता प्रवाही प्रवास हवा.

 -अभिजित पाटील, सांगली

Back to top button