मेसेजचे निमंत्रण; अ‍ॅप डाऊनलोड केल्यास खात्यातून पैसे होतील गायब | पुढारी

मेसेजचे निमंत्रण; अ‍ॅप डाऊनलोड केल्यास खात्यातून पैसे होतील गायब

कोल्हापूर : प्रवीण मस्के

मित्राने, तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केलेत, असा मेसेज आला असेल तर सावधान..तुमच्या बँक खात्यातून पैसे गायब होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरकरांच्या मोबाईल मेसेज बॉक्समध्ये ‘तुमच्या मित्राने खात्यात एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्‍कम जमा केली आहे’, असे मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये दिलेला कोड वापरा, लिंक डाऊनलोड

करा, असे मेसेजमध्ये म्हटले आहे. परंतु काही जणांचे समान नावाचे मित्र असतात, त्यांनी आपल्या बँक खात्यावर पैसे का टाकले असतील? या प्रश्‍नाने मोबाईलधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित नावाच्या मित्राशी संपर्क केल्यानंतर त्याने कोणतेही पैसे न पाठविल्याचे कळल्यावर अचंबित होतात. 

कोल्हापूर पोलिस सायबर कक्षाच्या मते हे सर्व मेसेज ब्लक आणि फसवे आहेत. अशा प्रकारचे मेसेज डाऊनलोड केल्यास मोबाईल डाटा चोरून घेतला जाऊ शकतो. याच्या पुढे जाऊन हॅकर बँक खात्यातील रक्‍कम परस्पर ऑनलाईन बँकिंगद्वारे काढून घेऊ शकतात. हे सर्व मेसेज फसवे असून त्यांनी पाठविलेल्या इंटरनेट लिंकवर संपर्क साधल्यास मोठी फसवणूक होऊ शकते. मोबाईलवर आलेल्या फसव्या मेसेजना बळी पडू नका, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून आलेले सर्व मेसेज व ई-मेल फसवे असतात. नागरिकांनी अशा प्रकारे आलेल्या कोणत्याही फसव्या मेसेजना बक्षीस व पैशाच्या आमिषाला बळी पडू नये. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपसह इतर ठिकाणी अशा मेसेजबाबत सतर्क राहण्यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.प्रवीण चौगुले, पोलिस निरीक्षक

Back to top button