श्री गणेशाला का वाहतात दुर्वा? | पुढारी

श्री गणेशाला का वाहतात दुर्वा?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

सगळ्‍यांना माहिती असेल आपल्‍या लाडक्‍या बाप्‍पाला दुर्वा खूपच प्रिय आहेत. त्‍यामुळे गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात  व गणपती प्रसन्‍न होतो, असे मानतात. त्‍यासाठी सर्व भक्‍त गणपतीला एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करतात. पण  आपल्‍या लाडक्‍या श्री गणेशाला दुर्वा का वाहतात, हे कधी जाणून घ्‍यायचा प्रयत्‍न केला आहे. या गणपती उत्‍सवाच्‍यानिमित्ताने  दुर्वा का वाहतात जाणून घेऊयात.

श्री गणेशाला का वाहतात दुर्वा?

ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. अशी एक आख्यायिका सांगितली जाते. 

औषधी वनस्पती

दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

दुर्वा याचा अर्थच प्राण 

दुर्वा याचा अर्थच प्राण किवा जीव असा आहे. त्या पवित्रतेचे प्रतीक आहेत. दुर्वा अनेक मुळांतून उगवतात. दोन पानी दुर्वा माणसाच्या सुखदुःखाचे द्वंद परमात्म्याकडे पोहोचवितात. तीन पानी दुर्वा यज्ञात वापरल्या जातात. कारण त्या भौतिक, कर्म आणि माया यांचे प्रतीक असून मनुष्यातील या तिन्ही दोषांचे यज्ञात दुर्वा भस्म केल्यामुळे भस्म होते अशी समजूत आहे. पाचपानी दुर्वा या पंचप्राण स्वरूप आहेत. गणेशाला या तिन्ही प्रकारच्या दुर्वा जुडीच्या स्वरूपात वाहिल्या जातात. 

 

Back to top button