त्वचेच्या सौंदर्यासाठी... | पुढारी

त्वचेच्या सौंदर्यासाठी...

पूर्वी महिला चेहऱ्यासाठी स्वयंपाकघरातील वेगवेगळी पिठं, भाज्या आणि फळांचे गर यांचा वापर करत असायच्या. त्यामुळे सौंदर्यात भर पडायचीच; त्याबरोबरच वाढत्या वयाच्या खुणाही लपून राहायच्या. सध्याच्या कॉस्मेटिकच्या वाढत्या वापरात घरगुती सौंदर्य घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सौंदर्यासाठी घरगुती घटकांचा वापर नेहमीच फायदेशीर ठरतो. घरगुती डाळी, भाज्या आणि फळे यांच्या साहाय्याने त्वचेचे सौंदर्य कशाप्रकारे खुलवता येते, त्यासंबंधीच्याच काही टीप्स…

आपल्या त्वचेसाठी रोजच्या आहारातील डाळी, भाज्या, फळे, दुध आणि दही हेच घटक उत्तम कॉस्मेटिक्स म्हणून काम करत असतात. त्याचा त्वचेला कायमस्वरूपी चांगला फायदादेखील होतो. त्यासाठीच स्वयंपाकघरातील नॅचरल कॉस्मेटिक्स कसे वापरावेत यासंबंधी माहिती प्रत्येक महिलेला असावी. त्वचेवरील वयाच्या खुणा दिसू नयेत, असे प्रत्येक महिलेला वाटत असते. त्यासाठी साधा घरगुती पर्याय आहे. उपाय करून काही समस्या दूर करता येतात.

१) हिरव्या मुगाचं किंवा लाल मसुराचं पीठ क्लीनजर म्हणून वापरल्यास त्याचा त्वचेवर चांगला परिणाम दिसून येतो. तसेच बेसनपीठ वापरताना आपल्या त्वचेचा प्रकार लक्षात घेवून त्यामध्ये फळांचा गर किंवा रस मिसळून लावल्यास त्वचेच्या सौंदर्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.

२) दोन चमचे हिरव्या मुगाचे पीठ, चार चमचे दूध किंवा दही, दोन चमचे ओटमील हे घटक एकत्र करून तयार केलेला लेप उत्तम क्लिजर म्हणून काम करतो.

३ ) सुरकुत्या पडलेल्या त्वचेसाठी पपईचा गर हा एक क्लिजर म्हणून उत्तम पर्याय आहे.

४) पपईच्या गरात कोरडे बदाम वाटून त्यामध्ये मिसळून लावावे. पपईच्या गरामुळे त्वचेतील पेशींना बळकटी मिळण्यास मदत होते; तसेच त्वचा तुकतुकीत बनते.

५) तीळ वाटून तिळापासून तयार केलेल्या लेपानं चेहऱ्याचा मसाज करावा. तसेच बदामाची पेस्ट करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मऊ आणि लवचिक बनण्यास मदत होते.

दुपारची सुर्यकिरणे, वातावरणातील बदल, बाहेरचे खाणे, चहा, कॉफी, तसेच अल्कोहोलचा अतिवापर, ताणतणाव, सतत ‘एसी’मध्ये राहणे याचेही त्वचेवर वाईट परिणाम होतात. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्वचा नेहमी स्वच्छ ठेवावी. भरपूर पाणी पिणे, तसेच आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. पुरेशी आणि शांत झोपही त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पुरेसा व्यायाम या गोष्टी नियमितपणे केल्यास त्वचा उत्तम राहण्यास मदत होते.
– अपर्णा देवकर

Back to top button