कलाईडोस्कोप : स्वतःकडे योग्य लक्ष द्या… | पुढारी

कलाईडोस्कोप : स्वतःकडे योग्य लक्ष द्या...

मला असं वाटतं की, माझ्या जोडीदाराला माझ्यात आता कसलाच रस उरला नाहीये. कारण पूर्वीसारखं आमच्यात काहीच राहिलेलं नाही. म्हणजे आम्ही महिन्यात एखादवेळेस किंवा दोनेक महिन्यात एकदा कधीतरी जवळ येतो. मीही फार काही बोलत नाही याविषयी. कदाचित आता आम्ही सोबत राहून इतकी वर्षं झालीत, त्यामुळे हे होत असावं. यावर कसं बोलणार किंवा काय बोलणार? पण माझी तगमग होते किंवा कधीतरी असं वाटतं की त्याला कळत नाही का हे? सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात का?

एक चाळिशी जवळ आलेली स्त्री तिचं मन माझ्यासमोर मोकळं करत होती.

हे बर्‍याच जोडप्यांमध्ये दिसतं. सोबत राहणार्‍या दोघांनाही हे प्रकर्षाने जाणवू शकतं. स्त्रियांना अशी भावना येत असेल तर काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

सोबत राहण्याचा कालावधी वाढत जातो तसतसे एकमेकांच्या सहवासाची सवय होते. तिथे शारीरिक आकर्षणाकडे कालानुरूप दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. 

कामजीवनातील आनंद कायम टिकवण्यासाठी त्यात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

शारीरिक स्वच्छता हा यातील सर्वात महत्त्वाचा भाग. या स्वच्छतेमध्ये गुप्तांगांची स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

स्त्रियांच्या बाबत योनीमार्गाच्या स्वच्छतेची काळजी शरीराकडून नैसर्गिकरित्या बर्‍याच अंशी घेतली जाते. योनी मर्गातून नैसर्गिक स्रवणारे स्राव आणि यामध्ये असणारे उपयुक्‍तजिवाणू हे यासाठी कारणीभूत असतात.

शरीरातील इतर सर्व द्रव्यांप्रमाणे, स्रावांप्रमाणे, यालाही काही विशिष्ट गंध असतो. हा द्राव योनीचे,  तिच्या आतल्या आवरणाचे संरक्षण करतो.

काही स्त्रिया यालाच श्वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे जाणे, पाणी जाणे असे समजतात. परंतु हा स्राव पारदर्शक असेल शिवाय त्याचा इतर कोणताही त्रास नसेल तर तो संपूर्ण सामान्य असतो.

स्रियांच्या मासिक पाळीनुसार, म्हणजेच संपूर्ण महिन्याच्या हार्मोनल सायकल; ऋतुचक्रानुसार या स्रावाचे प्रमाण कमी अधिक होते. परंतु योनीला, त्याच्या आजूबाजूला खाज येणे, दाह होणे किंवा नेहमीपेक्षा वेगळा स्राव बाहेर पडणे, त्याला विचित्र वास येणे, कंबरेच्या खालच्या बाजूस किंवा ओटीपोटात दुखत राहणे, संबंधांनंतर वेदना होणे किंवा इजा झाल्यासारखे वाटणे, या किंवा अशा सर्व बाबतीत लगेचच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेतलेला उत्तम .

योनीमार्गाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला बर्‍याचदा सुशोभीकरणाच्या भ्रामक कल्पनातून बर्‍याच स्त्रियांकडून कळत नकळत इजा पोहचवली जाते. जसे काही मलमं, क्रिम वापरणे किंवा सुगंधी द्रव्यं वापरणे, भरपूर पावडर वापरणे इत्यादी. परंतु साध्या पाण्याने रोज योनीच्या, त्याच्या आजूबाजूच्या भागाची स्वच्छता पुरेशी असते.

गुप्तांगांबरोबरच आपल्या दातांची, हिरड्यांची काळजीही महत्त्वाची. तोंडाला येणारा वास किंवा सुटणारी घाण यामुळेही कित्येकदा कामजीवनात विरस झालेला दिसतो. त्यामुळे जोडीदाराने हे लक्षात आणून दिल्यास त्याविषयी कमीपणा न बाळगता, राग न येऊ देता उपाय करावा .

शरीराला येणारा घाम याबाबतीत हेच तत्त्व. जर घामाला फारच दुर्गंधी असेल तर आपण पुरेसं पाणी पितोय का? व्यवस्थित आहार, झोप होतेय का? हे बघणे गरजेचे. कारण घामाला असणारी दुर्गंधी ही सुद्धा शारीरिक आकर्षणाबाबत अडसरासारखी येऊ शकते.

आपले कामजीवन, कामेच्छा ही अर्थातच बर्‍याच अंशी समोर दिसणारे शरीर व त्याविषयी वाटणारे आकर्षण, निर्माण होणार्‍या भावना आणि त्यानंतर येणारी पूर्तता या सगळ्याच अनुभवावर अवलंबून असते. त्यामुळे आपण नीटनेटके दिसावे, रहावे, शरीराला प्रमाणबद्धता देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे वाटणे साहजिकच! त्यात गैर काय? त्याला न डावलता स्वतःकडे नक्‍कीच योग्य लक्ष द्यावे.

Back to top button