सिल्क साडीची देखभाल | पुढारी | पुढारी

सिल्क साडीची देखभाल | पुढारी

सिल्क साडी ही तुलनेने बरीच महागडी असते. साहजिकच ती वापरताना बरीच काळजी घ्यावी लागते. योग्य प्रकारे देखभाल न घेतल्यास या महागड्या साड्या लवकर खराब होतात. असे होऊ नये यासाठी…

सिल्कच्या साड्या अतिशय नाजूक आणि महागड्या असतात. त्यामुळे त्या ठेवतानाही व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. या साड्यांची देखभाल करण्यात जराजरी निष्काळजीपणा झाला, तर साड्या खराब होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत. 

सिल्कच्या साड्या खराब होऊ नयेत यासाठी त्या मऊ, पांढर्‍या मलमलच्या कापडात ठेवाव्यात. काही स्त्रिया या साड्या वापरून न धुताच कपाटात कोंबून ठेवतात. हे चुकीचे आहे. त्यामुळे या साड्या खराब होतात. म्हणूनच साड्या ठेवण्यापूर्वी त्या जरूर ड्रायक्लिन कराव्या. सिल्क साड्या हँगरला टांगून ठेवू नयेत. त्यामुऴे त्यावर डाग पडू शकतात. तसेच साडी चिरली जाऊ शकते. साड्यांच्या मध्ये ब्राऊन पेपर किंवा व्हाईट पेपर ठेवावा. त्यामुळे डागही पडत नाही शिवाय त्याला कसर लागत नाही. जरीकाम असलेल्या साड्या उलट्या टांगून ठेवाव्यात. 

सिल्कची साडी नेहमी इस्त्री करून ठेवावी. इस्त्री करताना पाण्याचा वापर करू नये. कारण त्यामुळे जरी काळी पडू शकते. साडीवर डाग पडले असतील, तर नरम कापडाने ते पुसावेत. मग सुकवून त्या साड्या पुन्हा ठेवून द्याव्यात. साड्यांमध्ये नेप्थॅलिन बॉल्स चुकूनही ठेवू नयेत. त्यामुळेही जरी काळी पडू शकते. 


 

Back to top button