ऑफिसमधील योगदान | पुढारी | पुढारी

ऑफिसमधील योगदान | पुढारी

ऑफिसमध्ये महिला पुरुषांपेक्षा अधिक प्रामाणिक आणि  मेहनती असतात, असे मागे एकदा एका सर्वेक्षणात नमूद केले होते. तरीही बढतीच्या वेळी स्त्रियांपेक्षा पुरुषांना प्राधान्य दिले जाते. त्यावेळी खट्टू व्हायला होते. आपण जीव तोडून मेहनत करतो; पण आपल्याला त्याचे फळ मिळत नाही, असे वाटत राहते. ऑफिसमध्ये काम करणे म्हणजे केवळ आपल्या टेबलवर येणारे काम मोडून करणे नव्हे, तर इतर अ‍ॅक्टिविटीजमध्ये सहभागी होणेही असते. त्याबाबतीत काही वेळा महिला मागे पडतात. म्हणूनच ऑफिसचे काम आपण सांगकाम्याप्रमाणे करत नाही आहोत, तर त्यात रस घेऊन करत आहोत हे तुमच्या बॉसला, मॅनेजमेंटला कळणे आवश्यक असते. 

• विचार व्यक्‍त करा : तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करत असता. तरीही त्या कामात काही सुधारणा करणे गरजेचे वाटत असेल, तर त्याबद्दल स्पष्टपणे वरिष्ठांशी बोला. तुमचे तुमच्या कामाबाबतचे विचारही वेळोवेळी सांगत रहा. एखादे वेळेस हे विचार वरिष्ठांना पटणारही नाहीत किंवा तुमचे विचार व्यक्‍तकरणेही आवडणार नाही. तरीही निराश न होता संधी मिळेल तेव्हा ते विचार व्यक्‍तकरा. कारण त्यातूनच त्या कामाविषयी तुम्हाला किती आत्मीयता आहे ते वरिष्ठांना समजेल. 

• मीटिंग्जमध्ये गप्प राहू नका : मीटिंग्जमध्ये अनेक जण काही बोलत नाहीत. महिला तर आजिबातच बोलत नाही. पण असे करणे योग्य नाही. मीटिंगच्या विषयात रस घेऊन सहभागी व्हा आणि तुमचे विचार खुलेपणाने व्यक्‍त करा. वरिष्ठांना त्यातून कामाविषयीची तुमची आत्मीयता आणि तयारी दिसून येईल. महिला म्हणून तुम्ही कुठेही कमी नाही, याची जाणीव त्यामुळे तुम्ही त्यांना करून द्याल. 

• ऑफिसच्या इतर अ‍ॅक्टिविटीजमध्येही भाग घ्या : घरची जबाबदारी महिलांवर असल्याने त्यांना कामाव्यतिरिक्‍त ऑफिसच्या इतर अ‍ॅक्टिविटीजमध्ये भाग घ्यायला बर्‍याचदा जमत नाहीच. पण म्हणून अशा अ‍ॅक्टिविटीजपासून अगदीच अलिप्त राहणेही योग्य नाही. जितका वेळ आपल्याला अशा कार्यक्रमांसाठी देणे शक्य आहे तेवढा तो द्यावा. त्यातून आपली ऑफिसविषयी वाटणारा जिव्हाळा स्पष्ट होतो. 

 • जबाबदारी घ्या : काही वेळा एखादे काम आपण करू शकू असे वाटत असते, पण पुढे जाऊन ते काम मी करते, असे सांगण्याचे धाडस आपण करत नाही. मग नंतर वाटत राहते की ते काम आपण आणखी चांगल्या तर्‍हेने करू शकलो असतो. अशी रूखरूख मनाला लावून घेण्यापेक्षा अशा नव्या कामाची जबाबदारी आपणहून स्वीकारण्याची तयारी दाखवा. कुणी आपल्याला ती जबाबदारी देईल आणि आपण ती स्वीकारू, याची वाट पाहत राहू नका. 

• गॉसिपिंग करू नका : काही प्रमाणात गॉसिपिंग करणे चांगले असते. आपल्या मनावरचा ताण कमी होतो. पण हे गॉसिपिंग म्हणजे बाजारगप्पा नसाव्यात की कुणाच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे नसावे. कंपनीबाबत वाईटसाईट बोलणे तर आजिबात नसावे. कंपनीत तुम्ही जोपर्यंत कामावर आहात तोपर्यंत कंपनीसाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचाच तुमचा प्रयत्न असायला हवा. शिवाय, ज्या कंपनीत तुम्ही काम करता त्याविषयी तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील, तर तेथे काम करताना तुम्हाला ना कुठली उमेद वाटेल, ना कामाबद्दल तुम्ही सकारात्मक असाल.  

ऑफिसमध्ये प्रगती करायची असेल, तर केवळ नेमून दिलेले काम चोख करणे एवढ्यापुरतेच तुमचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवू नका. कंपनीच्या कामात रस दाखवा आणि मोठी जबाबदारी घेण्याची तयारी आणि क्षमता दाखवा. मग बढतीच्या वेळी तुम्हाला डावलणे कुणाला शक्यच होणार नाही. 


 

Back to top button