आई-वडील होण्यापूर्वी 'हा' विचार हवाच! | पुढारी

आई-वडील होण्यापूर्वी 'हा' विचार हवाच!

पूर्वीच्या काळी लग्न जुळवताना विश्वासू मध्यस्थ असत. परंतु आता चित्र बदलले आहे. मुले-मुली स्वतंत्र विचारांची, शिकलेली असतात. परस्पर लग्नं जुळतात. परिणामी अनेक ठिकाणी लग्नानंतर काही दिवसातच कुरबुरी सुरू होतात. कधी हुंड्याचे निमित्त, कधी विचार भिन्नता, तर  कधी वागण्याच्या सवयी वेगळ्या. अशी अनेक कारणे असतात. या वादाचे कोणतेही क्षुल्लक कारण अनेकदा घटस्फोटापर्यंत पोहोचते. स्वतःच्या अविचाराने आई-वडील कोर्टात भांडतात. अशा वेळी लहान मुलांना प्रचंड मानसिक त्रास होत असतो.

अशा अडचणी येऊ नये यासाठी एक मार्ग असू शकतो. आपले विचार नीट जुळतात का, हे पाहूनच मुळात लग्न करायला हवे. लग्न करताना बर्‍याचदा आपल्या मनाचा विचार यापेक्षा वडीलधार्‍यांचा आग्रह, भावना, आदर, अनेक गोष्टींचे ओझे आपल्या मनावर असते. पण लग्नानंतर बाळाचा निर्णय घेताना मात्र खंबीर होणे गरजेचे आहे. लग्नानंतर लगेचच पालक होण्याची घाई करू नये. परस्परांची मने जुळणे अत्यावश्यक असते.

आपला संसार कसा असावा याचा विचार; आपल्या मुलांच्या संदर्भातील विचार; या सगळ्या गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक तो वेळ देणे जरूरीचे ठरते. लग्नानंतर स्त्री-पुरुष शिक्षण किंवा पुढील शिक्षण करिअर व नोकरी या सगळ्यांवर संपूर्ण विचार करून दोघांच्या सहमतीने बाळाच्या जन्माचा विचार करायला हवा.

आपल्या मुलाचे संगोपन नीट करायचे, तर जसे आवश्यक ज्ञान आपल्याला हवे; तसेच आपल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी आपली मनस्थितीही प्रसन्न असायला हवी. मातृत्वाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्याला झालेले मूल हे आपल्यावर अनावश्यक पडलेली जबाबदारी आहे, असे वाटणे किंवा आपण आई-वडील झालो म्हणजे नेमके काय झाले? याची जाणीव असणे, या दोन्ही गोष्टी तुमच्या मुलांच्या विकासावर परिणाम करणार्‍या असतात, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आई-वडील होण्यापूर्वी पूर्ण विचार करणे अत्यंत गरजेचे आहे; यात शंकाच नाही.

Back to top button