थंडीत अशी घ्या पायांची काळजी!
थंडीत पायांच्या समस्या वाढतात. पायाची कातडी कोरडी होणे, टाचा फुटणे यासारख्या समस्या जाणवू लागतात. त्या दूर करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्यायला हरकत नाही.टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम म्हणजेच तेल पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहोचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात व भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधी कधी त्यातून रक्तही येते.
दीड चमचा व्हॅसलिन व एक लहान चमचा बोरीक पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करा व भेगांवर हा लेप जाडसररीत्या लावा. काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील. टाचा जास्तच फुटलेल्या असतील, तर मिथिलेटेड स्पिरीटमध्ये कापसाचा बोळा भिजवून फुटलेल्या टाचेवर ठेवा. असे दिवसातून 3-4 वेळा करा. त्यामुळे टाचा बर्या होऊ लागतात. कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाका. त्या पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवा. त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरीट लावून टाचांना प्युमिक स्टोनने किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा. त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल.
टाचा मऊसर घासणीने घासल्यावर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालिश करा. पाय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पॅडिक्युअरचा अवश्य वापर करा. कारण पायाची नखे, टाचा यांच्या स्वच्छतेचा हा एक चांगला उपाय आहे. पॅडिक्युअरसाठी प्रथम नेलपेंट रिमूव्हरने काढून टाका. नेलकटरने वाढलेली नखे कापा. तसेच नेलफायलरने नखांना चांगला आकार द्यावा.टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साईड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात तीन चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा. त्यात पाय 5-10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते. 8-10 मिनिटांनंतर प्युमिक स्टोनने किंवा घासणीने घासून घाण साफ करा. नंतर टॉवेलने पुसा.