परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट : रोजगाराची चांगली संधी | पुढारी

परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट : रोजगाराची चांगली संधी

जर आपण सुगंधी अत्तराचे चांगले जाणकार असाल तर आपल्याला परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट म्हणून रोजगाराची चांगली संधी मिळू शकते.

अत्तराचा वापर हा मेसोपोटमियन काळातील नागरिकांपासून होत असल्याचे सांगितले जाते. हजारो वर्षांनंतरही अत्तराचे महत्त्व अद्याप कमी झालेले नाही. याउलट या व्यवसायात आमूलाग्र बदल झाले आहेत. या क्षेत्रात युवकांसाठी करिअरची नवीन कवाडे उघडली आहेत. जर आपल्यालाही अत्तराचा शौक आहे, सुवासिक वासाची आवड आहे तर यशस्वी परफ्युमर किंवा फ्रॅग्रेन्स केमिस्ट म्हणून वावरू शकता.

बाजारात वाढत्या ब्रँडस्, स्पर्धा पाहता या उद्योगाचे स्वरूप बदलले गेले आहे. करिअर कौन्सिलर डॉ. अनुभूती सेहगल यांच्या मते, सध्याच्या काळात देश-विदेशात सुगंधित अत्तराला चांगली मागणी आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे अत्तर येत आहेत. अत्तरापासून वेगवेगळा सुगंध तयार करणार्‍याला प्रोफेशनल्स परफ्यूमर्स असे म्हटले जाते. हे फ्रॅग्रन्स प्रॉडक्शनमध्ये विशेष भूमिका बजावतात. एखादे अत्तर तयार करताना त्याची गुणवत्ता राखण्यासाठी परफ्यूमर दक्ष असतात. एखादा फ्लेवर तयार करण्यासाठी कोणकोणत्या घटकांची, गुणद्रव्याची गरज असते, हे परफ्यूमर पाहतात.

परफ्यूमर कोण असतात?

अत्तराचे कॉम्पोजिशन आणि त्याची फ्लेवरिंग तयार करणार्‍या तज्ज्ञाला परफ्यूमर असे म्हणतात. फ्रॅग्रन्स प्रॉडक्शनमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते. हे अत्तरात वापरण्यात येणार्‍या पदार्थाची गुणवत्ता आणि प्रभाव ओळखून नवीन अ‍ॅरोमा फॉर्म्युला तयार करतात. एवढेच नाही तर अत्तरासारखे प्रत्येक प्रकारचे प्रॉडक्ट जसे की एअर फ्रेशनर्स, रूम फ्रेशनर्स, अँटीपरस्मिरेंटस, लाँड्री आणि क्लिनिंग प्रॉडक्टस्, पर्सनल केअर प्रॉडक्टस् आदींसाठी अ‍ॅरोमा फॉर्म्युला तयार केला जातो. त्यांना फ्रॅग्रन्स केमिस्ट असेही म्हटले जाते.

आवश्यक अभ्यासक्रम

या उद्योगात करिअर करण्यासाठी इंटरमीडिएटमध्ये रसायनशास्त्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर रसायनशास्त्रातून बीएससी किंवा एमएससी करणे अनिवार्य ठरते. याशिवाय आपण परफ्यूमरी अँड फ्लेवर्स टेक्नॉलॉजीत मास्टर्स, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम इन अ‍ॅरोमा मॅनेजमेंट, अरोमा टेक्नॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, परफ्युमरी अँड कॉस्मेटिक
मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट करू शकता.

व्यक्‍तिगत कौशल्य

एक उत्तम परफ्यूमर होण्यासाठी सेन्स ऑफ स्मेल असणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय आपण वेगवेगळे सुंगध आकर्षितरीत्या सादर करणे, चांगली स्मरणशक्‍ती, प्रयोगशाळा कौशल्य, संवाद कौशल्य, चांगले लिखाण, टाईम मॅनेजमेंट, टीम वर्किंग स्किल्स, धाडस आदी गुण अंगी असणे आवश्यक आहे.

भविष्यातील संधी

आपण मोठमोठ्या परफ्यूम हाऊसेस किंवा कंपनीत क्रिएटिव्ह, अ‍ॅप्लिकेशन किंवा मूल्यमापन विभागात काम करू शकतात. याशिवाय आपण फूड अँड ब्रेव्हरेज, टी अँड वाईन आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीत देखील काम करू शकता. प्रारंभीच्या काळात वीस ते पंचवीस हजार आरामात वेतन मिळू शकते. तर क्रिएटिव्ह डिपार्टमेंटमध्ये परफ्यूमर काही वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर मासिक 60 ते80 हजार रुपयांचे वेतन मिळवू शकतात.

प्रमुख संस्था

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
व्ही.जी. वझे कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई
फ्रॅग्रन्स अँड फ्लेवर डेव्हलपमेंट सेंटर, कन्नोज मुंबई विद्यापीठ,
मुंबई.

अपर्णा देवकर

Back to top button