इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील तंत्रज्ञान आणि संधी - पुढारी

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधील तंत्रज्ञान आणि संधी

इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीने मानवी जीवन सुलभ केले आहे. दैनंदिन रोजच्या वापरातील वस्तूंपासून ते अगदी अंतराळातील मानवनिर्मित वस्तूंपर्यंत इलेक्ट्रॉनिक्सने सर्व काही व्यापलेले आहे. सध्या कोरोनामुळे मानवी जीवनावर काही मर्यादा आल्या. पण इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधील तंत्रज्ञानामुळे काही बाबतीत या मर्यादांवर मात करता आली.

सध्याच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन शिक्षण किंवा इतर ऑनलाईन सेवा आणि कार्यालयीन कामकाज हे सर्व टेलिकम्युनिकेशनमधील डेटा टेलिकम्युनिकेशन पद्धत आणि जास्त बँडविड्थमुळे शक्य झाल्या आहेत.

कोसो मैल दूर राहून आपण संभाषण करू शकतो, एकमेकांना पाहू शकतो, परिस्थिती जाणून घेऊ शकतो ही सर्व टेलिकम्युनिकेशनची करामत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा आवाका फार मोठा असून यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो. चार वर्षांचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हे अभियंते टेलिकम्युनिकेशन, एम्बईद्देड सिस्टिम्स, कॉम्प्युटर नेटवर्किंग, सर्किट अँड सिस्टीम डिझाईन, सिस्टीम प्रोग्रामिंग, चिप डिझाईन, इंटरनेट ऑफ थिंग्स, इमेज प्रोसेसिंग इत्यादी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी सज्ज होतात.

आपली आवड आणि कौशल्य यांची योग्य ती सांगड घालून या क्षेत्रामध्ये यश मिळवता येते. तसेच इलेक्ट्रॉनिक्सचा आवाका हा व्यापक असल्यामुळे त्याचा वापर हा ऑटोमोबाईल, ऊर्जा, मेकॅनिकल, कृषी, वैद्यकशास्त्र, अंतराळशास्त्र अशा आणि इतर शाखांमध्येही केला जातो.

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करता येते. उदा. खासगी क्षेत्रामधील असंख्य कंपन्या इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांची नेमणूक करतात. यामध्ये वेगवेगळ्या सिस्टिम्सची संरचना तयार करणे, प्रोग्रामिंग करणे, मॉडेल तयार करणे अशा प्रकारचे काम करावे लागते.

केंद्र सरकारच्या भारतीय अभियांत्रिकी सेवेच्या यू.पी.एस.सी. मार्फत दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात. त्यातून क्लास 1 अधिकारी होता येते. तसेच भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्यरत कंपन्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्यांची दरवर्षी निवड केली जाते. याबरोबरच सैन्य दलामधील कोर ऑफ सिग्‍नल्स, संभाषण देवाणघेवाण तसेच नाविक दल, हवाई दल यामध्ये अधिकारी म्हणून भरती केली जाते.

त्यासाठी उमेदवारांना एस.एस.बी. ची मुलाखत द्यावी लागते. भारत सरकारच्या डी.आर.डी.वो., इस्रो अशा संस्थांमध्ये या अभियंत्यांची शास्त्रज्ञ म्हणूनही निवड केली जाते. स्वतःची कन्सल्टन्सी किंवा इंडस्ट्री काढणेसुद्धा शक्य आहे. या क्षेत्रात सतत बदल होत असल्याने आणि नवीन तंत्रज्ञान येत असल्याने यात नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी भरपूर वाव आहे.

डॉ. शामकुमार चव्हाण

Back to top button