‘हर्बल कॉस्मॅटिक्स’मधील करिअर, जाणून घ्या याविषयी

‘हर्बल कॉस्मॅटिक्स’मधील करिअर, जाणून घ्या याविषयी
Published on
Updated on

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि लघुउद्योग मंत्रालयाने गेल्या काही वर्षांपासून स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी चांगल्या योजना सुरू केल्या आहेत. या दिशेने पाऊल टाकण्यासाठी अनेक प्रशिक्षण संस्थादेखील सुरू केल्या आहेत. या ठिकाणी निःशुल्क प्रशिक्षण दिले जाते. अशाच संस्थांमधून राबवण्यात येणारा एक अभ्यासक्रम म्हणजे हर्बल कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंग. हर्बल कॉस्मॅटिक हे लघुउद्योगाचे उत्पादन आहे. याच्या विक्री व वितरणासाठी आणि निर्यातीसाठी सरकार अनेक प्रकारे मदत करत असते. त्याचसोबत कर्जदेखील उपलब्ध करून देते. आपण घरातच मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसवून कमी गुंतवणुकीत चांगली कमाई करू शकतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे, तर आपल्या देशातही अलीकडच्या काळात आपल्या त्वचेच्या बाबतीत लोक बरेच संवेदनशील बनले आहेत. त्यासाठी नामांकित ब्रँडचे स्किन सेंटरदेखील सुरू झाले आहेत. या सेंटर्समध्ये सामायिक गोष्ट म्हणजे सर्वांना हर्बल कॉस्मॅटिक्स हवे असतात. हर्बल कॉस्मॅटिकचा मूळ आधार म्हणजे औषधी वनस्पती होय. यामध्ये कुठल्याही प्रकारची रसायने नसतात. याच्या वापरामुळे त्वचा खराब होण्याची भीती नसते आणि त्यापासून रिअ‍ॅक्शन येण्याचीही शक्यता नसते. भारतामध्ये औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणूनच येथे हर्बल कॉस्मॅटिकचे उत्पादन तुलनेने सोपे आणि कमी गुंतवणुकीत करणे शक्य आहे.

मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसवण्यासाठीचा खर्च : आधीच सांगितल्याप्रमाणे हर्बल कॉस्मॅटिक्स उत्पादनासाठी औषधी वनस्पती आवश्यक असतात. यामध्ये चंदन, हळद, तुळस, कडुनिंब, कोरफड, नारळाचे तेल, लवंग इत्यादींचा उपयोग केला जातो. या कच्च्या मालासोबत भांडी गरम करण्यासाठी गॅस आणि एका खोलीची गरज असते. यामध्ये एक युनिट बसवता येते. या सर्व गोष्टींसाठी जवळपास लाखभर रुपयांपर्यंत खर्च येतो. आपल्याकडे स्वतःची जागा आहे की नाही, यावर हा खर्च अवलंबून असतो. तसेच किती मोठ्या प्रमाणात युनिट बसवणार आहोत, त्यावरही खर्च अवलंबून असतो. कारण मोठे युनिट बसवल्यास कर्मचारी ठेवण्यासाठी खर्च अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुरुवातीला छोट्या प्रमाणावर आपण हे उत्पादन सुरू करून जम बसल्यानंतर हळूहळू ते वाढवता येऊ शकते.

कर्जसुविधा : मॅन्युफॅक्चरिंग युनिट बसवण्यासाठी खर्चाचा जवळपास 90 टक्के भाग कर्जाच्या रूपात प्राप्त करता येऊ शकतो. महिला उद्योजकांना काही योजनांमध्ये सबसिडीदेखील मिळते. हे कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि केंद्र व राज्य सरकारच्या वित्तसंस्था देतात. कर्ज घेण्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी सर्व प्रकारची कागदपत्रे जमा करून ठेवावीत. म्हणजे कर्ज मिळण्याच्या प्रक्रियेस अधिक विलंब होणार नाही आणि काम त्वरित सुरू होईल.

हर्बल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये साबण, क्रीम, तेल आणि शॅम्पू याव्यतिरिक्तदेखील बरीच उत्पादने तयार करता येऊ शकतात. या उत्पादनांमध्ये केवळ औषधी वनस्पतींचाच वापर केला जातो. काही वेळा अ‍ॅलोपॅथी घटकदेखील यामध्ये वापरले जातात. नवेनवे उत्पादन बनवण्यामध्ये अधिक लाभ मिळू शकतो. कारण अलीकडच्या काळात हर्बल उत्पादने खरेदी करण्याकडे लोक अधिक आकृष्ट होत आहेत.

हर्बल शाम्पू मेकिंग : अलीकडच्या काळात शाम्पूचा वापर अगदी सामान्य झाला आहे. शाम्पू वापरल्यामुळे केस मुलायम आणि चमकदार बनतात. व्यावसायिक दृष्टीने ही गोष्ट अतिशय लाभदायक आहे आणि त्यामुळे त्याला असणारी मागणीदेखील अधिक आहे. शाम्पू बनवण्यासाठी नारळाचे तेल, कॉस्टिक पोटॅश, डिस्टिल्ड वॉटर, पोटॅशियम कार्बोनेट आणि सुगंधित पदार्थ यांचा वापर केला जातो. देशामध्ये कॉस्मॅटिक मॅन्युफॅक्चरिंगचे प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था आहेत. प्रशिक्षणाचा अवधी साधारण एक महिना असतो. यासाठी वयाची मर्यादा आणि इतर शैक्षणिक पात्रता फारशी बघितली जात नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news