रोजगाराच्या संधी : क्लिनिकल सायकॉलॉजी हा एक चांगला पर्याय | पुढारी

रोजगाराच्या संधी : क्लिनिकल सायकॉलॉजी हा एक चांगला पर्याय

राधिका बिवलकर

चांगल्या जीवनासाठी उत्तम शारीरिक आरोग्याबरोबरच उत्तम मानसिक आरोग्य असणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते. जर आपल्याला मानवी मेंदूतील रहस्य सोडवायचे असेल आणि मनोरुग्ण व्यक्तीवर उपचार करायचे असतील तर क्लिनिकल सायकॉलॉजी हा एक चांगला पर्याय मानला जातो.

क्लिनिकल सायकॉलॉजी हा विषय मानसिक आरोग्याच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि संपूर्ण मानसिक, भावनिक तसेच आचार विचारासंबंधी विकारांचा दबाव, चिंताग्रस्त, नैराश्य, मनोविकृती यावर प्रभावीपणे उपचार करून विकासाला प्रेरणा देण्याचे काम करते. माणसाचा चेहरा किंवा तो विचार कसा करतो हे ओळखण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजी शिकवते, असा अर्थ काढणे चुकीचे ठरते.

कारण, हा विषय केवळ यासंबंधी मिथक मानले जाते. मनुष्याचा मेंदू जेवढा गूढ आहे, तेवढीच त्याची कार्यप्रणाली देखील. क्लिनिकल सायकॉलॉजीत माणसाच्या आचार-विचाराबाबत माहिती दिली जाते. या विषयात मानवाच्या मेंदूसंबंधी प्रकृती, प्रक्रिया, प्रतिक्रिया आणि अन्य बाजूंवर संशोधन केले जाते.

क्लिनिकल सायकॉलॉजीची वैशिष्ट्ये : मानसोपचारतज्ज्ञ (सायकेट्रिक्स) पेक्षा वेगळे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट औषधी देत नाहीत. त्याचबरोबर विविध साधनांच्या आधारे मनोरुग्णाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. क्लिनिकल सायकॉलॉजी क्षेत्राचे अनेक विभागात वर्गीकरण करता येईल. त्यात कुटुंब व्यवस्था, सकारात्मक मनोविज्ञान, ट्रान्सपर्सनल, कॉग्निटिव्ह बिव्हेरियरल, सायकोडायनॅमिक, ह्यूमिनस्टिक किंवा एक्झिस्टेंशियल यासारखे वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतील. तज्ज्ञ मंडळी ताण, चिंता, स्क्रिझोफ्रेनिया, व्यसन आदींवर लक्ष केंद्रित करून मुले, ज्येष्ठ मंडळी, कुटुंबांचे संशोधन करून या क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात.

कामाचे स्वरूप : क्लिनिकल सायकॉलॉजिस्टची गरज साधारणपणे रुग्णालय, खासगी सेवा किंवा शैक्षणिक संस्थेत भासते. आयुष्यात येणार्‍या शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ मदत करत असतात. अशा घटनांमुळे चिंता, ताण, तणाव, वर्तन तसेच मानसिक आजाराचे कारण ठरू शकते. क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे कोणत्याही कॉलेज, विद्यापीठात संशोधन केल्यानंतर यासारख्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. ज्यांना समुपदेशन आणि मानसिक आधार देण्याची गरज आहे, अशा मंडळींसाठी मानसोपचारतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात.

कोण कोणते अभ्यासक्रम : मानसशास्त्र हा विषय काही कॉलेजमध्ये 11 वी आणि 12 ला विषयाच्या रुपातून शिकवला जातो. बहुतांशी विद्यापीठात मानसशास्त्र हा एक सामान्यप्रमाणे ऑनर्स विषय म्हणून शिकता येतो. मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील मिळवता येते. मानसशास्त्रात पदवी घ्यायची असेल तर बारावीला सर्व विषयांबरोबर मानसशास्त्राचा समावेश असणे महत्त्वाचे आहे. तसेच एम.ए. करायचे झाल्यास पदवी अभ्यासक्रमाला मानसशास्त्राचा विषय असणे अनिवार्य आहे. या विषयात डॉक्टरेट मिळवण्यासाठी यूजीसीकडून नेमलेल्या ज्युनिअर रिसर्च फेलोशिप लेक्चररशिप परीक्षा (राष्ट्रीय पात्रता परीक्षा-नेट) किंवा विद्यापीठस्तरीय परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

रोजगाराच्या संधी : अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात देशात मानसिक आजाराने पीडित असलेल्या लोकांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या तुलनेत मनोचिकित्सकांची किंवा मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमीच दिसून येत आहे. आगामी काळात या समस्यांचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मानसोपचारतज्ज्ञांची गरज भासणार आहे.

Back to top button