Nifty and Sensex : अर्थवार्ता - पुढारी

Nifty and Sensex : अर्थवार्ता

प्रीतम मांडके

* गतसप्ताहात बुधवारअखेर निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) निर्देशांकात अनुक्रमे 0.89 टक्के व 0.78 टक्क्यांनी वधारला. निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे 17829.2 अंक व 59771.92 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला.

* देशातील सर्वात मोठ्या सरकारी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर. बँकेचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 67 टक्के वधारून 7627 कोटी झाला. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 10.7 टक्के वधारून 28181 कोटींच्या तुलनेत 31,184 कोटी झाले. (Nifty and Sensex)

थकीत कर्जे तसेच इतर कारणांसाठी करण्यात येणार्‍या तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स) जबरदस्त घट झाल्याने नफा वाढला. मागील वर्षी याच किमतीत 10,118.3 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. परंतु यावर्षी त्यामध्ये तब्बल 98.1 टक्क्यांची घट होऊन केवळ 188.8 कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 5.3 टक्क्यांच्या तुलनेत 4.9 टक्के झाले, तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 1.6 टक्क्यांवरून 1.5 टक्के झाले.

* देशातील महत्त्वाची दूरसंचार क्षेत्रातील कंपनी ‘भारती एअरटेल’ची अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 300 टक्क्यांनी वाढला. या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 1,134 कोटींचा नफा झाला. कंपनीचा महसूल 6 टक्क्यांनी वाढून 28,326 कोटी झाला. दूरसंचार कंपन्यांसाठी महत्त्वाचे मानला जाणारा ‘अ‍ॅव्हरेज रेव्हेन्यू पर यूजर’ म्हणजेच ‘एआरपीयू’ (सरासरी प्रतिग्राहक महसूल) 153 रुपयांवर पोहोचला. भारती एअरटेलची स्पर्धक ‘रिलायन्स जिओ’चा एआरपीयू 143.6 रुपये आहे. मागील तिमाहीत एअरटेलचा ‘एआरपीयू’ 146 रुपयांपर्यंत होता. परंतु त्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी कंपनीने केली. (Nifty and Sensex)

* गतसप्ताहात बुधवारअखेर आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट केली. यामुळे पेट्रोल 5 रुपये, तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले.

* ऑक्टोबर महिन्यात भारताची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 42.3 टक्क्यांनी वाढून विक्रमी अशा 35.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. तसेच आयातदेखील 62.5 टक्क्यांनी वाढून 55.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. आयातमध्ये सर्वात मोठा वाटा हा तेल (पेट्रोलियम) आणि संबंधित उत्पादनांचा असून त्यानंतर सणासुदीच्या काळातील सोन्याची आयातीचा आहे. पेट्रोलियम पदार्थांची आयात तब्बल 141 टक्के वधारून 14.4 अब्ज, तर सोन्याची आयात 104 टक्क्यांनी वाढून 5.1 अब्ज डॉलर्स झाली.

* ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला ‘जीएसटी’च्या माध्यमातून विक्रमी अशा 1,30,127 कोटींचा महसूल मिळाला. एप्रिल 2021 वगळता आजपर्यंतचा हा सर्वाधिक महसूल आहे.

* गृहकर्ज पुरवठा करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ‘एचडीएफसी लिमिटेड’चा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचा नफा 32 टक्के वाढून 3780 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 17 टक्के वाढून 8255 कोटींवर पोहोचले. कंपनीचे व्यवस्थापन अंतर्गत मूल्य (अ‍ॅसेट अंडर मॅनेजमेंट) 5.40 लाख कोटींवरून 5.97 लाख कोटी झाले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 10 हजार कोटींपार गेले असले, तरी एकूण कर्ज वाटपाच्या प्रमाणाच्या केवळ 2 टक्के आहे. यासाठी एकूण 13,340 कोटींच्या तरतुदी (प्रोव्हिजन्स) करण्यात आल्या आहेत.

* देशातील महत्त्वाच्या तेल उत्पादन आणि शुद्धीकरण क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी ‘इंडियन ऑईल’ कंपनी पुढील 3 वर्षांत इलेक्ट्रीकवर चालणार्‍या वाहनांसाठी 10 हजार ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करणार.

* देशातील महत्त्वाची सरकारी बँक ‘बँक ऑफ इंडिया’चा चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचा निकाल जाहीर. निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 99.9 टक्के म्हणजेच दुप्पट होऊन 525.78 कोटींवरून 1050.98 कोटी झाला. निव्वळ व्याज उत्पन्न 14.24 टक्के घटून 4113 कोटींवरून 3523 कोटी झाले. तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण 2.89 टक्क्यांवरून 2.79 टक्क्यांपर्यंत खाली आले. यासाठी कराव्या लागणार्‍या तरतुदी (प्रोव्हिजन्स)मध्येदेखील 56.28 टक्क्यांची घट होऊन तरतुदी 2045 कोटींवरून 894 कोटीपर्यंत खाली आल्या.

* कोरोनाच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था तसेच उद्योगक्षेत्र पूर्वपदावर येत असल्याचे आशादायक संकेत. देशाची उत्पादन क्षेत्राची प्रगती दर्शवणारा ‘मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग इंडेक्स’ ऑक्टोबर महिन्यात 55.9 वर पोहोचला. 50 पेक्षा अधिकचा आकडा हा उत्पादन क्षेत्राची वाढ दर्शवतो. सप्टेंबर महिन्यात हा आकडा 52.7 होता.

* केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना 17 हजार कोटींची जीएसटी नुकसान भरपाई. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून 1 एप्रिल ते 1 नोव्हेंबरच्या कालावधीत 91.30 लाख करदात्यांना एकूण 1.12 लाख कोटींचा परतावा
जारी.

* धनत्रयोदशीच्या दिवशी मारुतीने 13 हजार गाड्या विकल्या. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे. विविध इलेक्ट्रॉनिक पार्टससाठी लागणार्‍या ‘सेमी कंडक्टर चीप’ची बाजारात कमतरता असल्याने कंपनीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे कंपनीचे म्हणणे. तरीदेखील टाटा मोटर्स कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 94 टक्के अधिक गाड्या विकल्या. कंपनीने अद्याप अचूक आकडा जाहीर केला नाही.

Back to top button